For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात डेंग्यूला रोखण्याची गरज

06:49 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात डेंग्यूला रोखण्याची गरज
Advertisement

आज गोवा राज्य आरोग्य सुविधांच्यादृष्टीने अव्वल म्हणून एकीकडे शेखी मिरवली जात असली तरी गोमंतकीय आरोग्याच्यादृष्टीने कितपत सुखरूप आहेत, हा एक संशोधनाचा विषय आहे. आज गोव्यात बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारभूत ठरलेले आहे मात्र याचा उपयोग गोवाव्यतिरिक्त अन्य राज्ये घेताना दिसतात. बहुतांश गोमंतकीय आज छोट्या-मोठ्या आजारावर मात करण्यासाठी सरकारी इस्पितळांऐवजी खासगी दवाखान्याकडे धाव घेताना दिसतो. सध्या पावसाळ्यात विविध रोगांचा फैलाव दिसत असून बहुतांश गोमंतकीय खासगी दवाखान्यात गर्दी करत आहेत.

Advertisement

संपूर्ण देशाबरोबरच गोव्यानेही कोरोना व्हायरसशी समर्थपणे तोंड दिले. सध्या महाराष्ट्रात झिका व्हायरसच्या प्रकरणांची नोंद झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जारी केलेल्या सल्ल्यानुसार, गोव्यातील रहिवाशांना डासांपासून होणाऱ्या व्हायरल संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्यास सुचविले आहे. त्यामुळे आरोग्य जपण्याचे गोमंतकीयांसमोर  मोठे आव्हान आहे. राज्यात सध्या पावसाचा कहर असून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एकूण रुग्णांपैकी 95 टक्के रुग्ण उत्तर गोव्यात आढळलेले आहेत. राज्यात एकूण 60 रुग्ण आढळल्याचा अहवाल आला असून त्यात उत्तर गोव्यात 52 तर दक्षिण गोव्यात 8 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य संचालनालयाने दिली आहे.

उत्तर गोव्यात सर्वाधिक 39 रुग्ण बार्देश तालुक्यात आढळले आहेत. तालुक्याचे केंद्र असलेल्या म्हापसा शहरात 17 रुग्ण आढळले असून करासवाडा आणि खोर्ली परिसर प्रभावित झाला आहे. डेंग्यूमुळे राज्यात एक बळी गेल्याचा संशय असून त्याची पुष्टी झालेली नाही. चाचणी अहवाल आल्यानंतर ते समजेल. दक्षिण गोव्यात रूमडामळ येथे 5 वर्षीय मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता. पावसाचे पाणी साचून रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य खात्यातर्फे सध्या लोकांना दक्षता घेण्यास सांगितले जात आहे. लोकांमध्ये डेंग्यूबद्दल माहिती जागृतीमार्फत पोहचवण्यात आली आहे. एखाद्या परिसरात डेंग्यूचा संसर्ग झाल्याची तक्रार केली जाते, तेव्हा बहुतांशवेळी तक्रारदाराच्या घरच्या कुंपणात स्रोत आढळतो. यासाठी लोकांनी प्रथम आपल्या वर्तनात बदल आणण्याची गरज आहे. पाणी साचल्यानंतर सात दिवसांच्या जीवनचक्रात डेंग्यूचे डास तयार होतात. त्या अगोदरच पाणी साचू न देण्याची गरज असते. त्यामुळे आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, अशी सूचना राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी केली आहे.

Advertisement

आजारांचा हंगाम असणाऱ्या पावसाळ्यात फ्लूसोबत डासांपासून होणारे संसर्गही बऱ्याचशा प्रमाणात आढळून येतात. एरव्हीही डासांमुळे होणाऱ्या संसर्गाचा उपद्रव वर्षभर होत असला तरी पावसाळ्यात याचे प्रमाण खूप वाढते. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासिस, व्हायरल एसिफिलाईटिस हे डासांमुळे होणारे संसर्ग जास्त प्रमाणात आढळून येतात. गोव्यात सध्या डेंग्यूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चाललेले आहेत.   जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी अनेक देशांमध्ये डेंग्यूचे प्रमाण सर्वसाधारणपणे जास्त आहे, असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 2024 च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये 7.6 दशलक्ष डेंग्यू प्रकरणांपैकी 3,000 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या प्रदेशात डेंग्यू प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे तर दक्षिणपूर्व आशिया आणि भारतातील परिस्थिती समाधानकारक नाही. बांगलादेश, भारत, म्यानमार, नेपाळ आणि थायलंड आदी पाच देश सध्या मान्सून हंगामाच्या प्रारंभाशी झुंजत आहेत ज्याठिकाणी एडीस डासांची पैदास झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.

उपचारांबद्दल, वेदना लक्षणांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. आतापर्यंत एक लस काही देशांमध्ये मंजूर झाली आहे. तथापि, उच्च प्रसारण सेटिंग्जमध्ये केवळ 6 ते 16 वर्षे वयोगटासाठी शिफारस केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक अतिरिक्त लसींचे मूल्यांकन केले जात आहे. गोव्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूचा प्रसार हंगाम जून ते पावसाळा संपेपर्यंत असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये गोव्यात डेंग्यूचे 335 रुग्ण होते त्यात एकाचा मृत्यू झाला होता. पुढच्यावर्षी प्रकरणांची संख्या 992 वर पोहोचली. पण जरी 2020 मध्ये मात्र 376 वर घसरली तर 2021 मध्ये 649 पॉझिटिव्ह चाचणी झाली. तीन वर्षात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 2022 मध्ये डेंग्यूचे 443 रुग्ण होते ज्यामध्ये एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि ही संख्या 300 च्या आत होती.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना आरोग्य संचालनालय करते. कोणत्याही व्यक्तीची जलद चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास आसपासच्या परिसरातील सुमारे 50 घरांमध्ये तापाचे सर्वेक्षण केले जाते आणि इतर कोणालाही या आजाराचा त्रास होत आहे की नाही हे तपासले जाते. ताप, डेंग्यू आणि मलेरियासाठी तातडीने रक्ततपासणी केली जाते जेणेकरून उशीर होणार नाही. डासांची उत्पत्ती तपासण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात घरोघरी भेटी दिल्या जातात. नाले आणि ख•dयांमधून साचलेले पाणी काढता येत नसेल तर डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अँटी-लाईव्ह उपाय केले जातात. आवश्यक त्याठिकाणी फॉगिंगही केले जाते. या मोहिमेदरम्यान आरोग्य संचालनालय नागरी संस्थांची मदत घेते.

यंदाच्या जागतिक डेंग्यू दिनाची थीम ‘समुदायाशी कनेक्ट व्हा, डेंग्यू नियंत्रित करा’ अशी आहे. जर समाजाने आम्हाला मदत केली तर आमचे डेंग्यूचे रुग्ण कमी होतील, असे डॉ. महात्मे यांचे म्हणणे आहे. खरेतर यश मिळविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. आरोग्य संचालनालय, नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या प्रयत्नांना पूरक म्हणून डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. आरोग्य संचालनालयाने शंभरहून अधिक घरांना त्यांच्या आजूबाजूच्या भागात डासांची उत्पत्ती रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल नोटिसा जारी करून सक्रियता दाखवली आहे. गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्याचे हे उल्लंघन आहे.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य संचालनालयापुढे मोठे आव्हान आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना एकत्र आणावे लागेल. शाळांमध्ये यासाठी जागरूकता कार्यक्रम होणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थी ते राहत असलेल्या परिसरात बदलाचे दूत होऊ शकतात आणि डेंग्यूशी लढा अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या कमतरतेच्या परिणामांपैकी हा आजार असल्याने याचा फैलाव रोखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे त्यासाठी याकडे गांभीर्याने पहावे लागेल.

राजेश परब

Advertisement
Tags :

.