For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादईकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

10:23 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्हादईकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
Advertisement

पिळर्ण येथे परिसंवादात मान्यवरांकडून व्यक्त झालेला सूर

Advertisement

पणजी : न्यायालयीन वाद आणि अभियांत्रिकी गणितांच्या पलीकडे जाऊन गोव्यातील सर्वाधिक वादग्रस्त नैसर्गिक व्यवस्थांपैकी एक असलेल्या म्हादई (मांडवी) नदीकडे व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मत म्युझियम ऑफ गोवा (मोग), पिळर्ण येथे झालेल्या मोग संडे सत्रात तज्ञांनी व्यक्त केले. ‘फ्रॉम वॉटर रिसोर्सिस टू कॉमन्स: रिफ्रेमिंग द म्हादई डिस्प्युट’ या शीर्षकाखाली झालेल्या या चर्चेत सादरीकरण आणि चित्रपट प्रदर्शनानंतर झालेल्या संवादात, म्हादई नदीला केवळ तांत्रिक मुद्द्यापुरते मर्यादित करून तिची पर्यावरणीय गुंतागुंत, सांस्कृतिक जीवन आणि ऐतिहासिक खोली दुर्लक्षित केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दक्षिण गोव्यातील बिट्स पिलानी येथे विकास अध्ययन व राजकारण विषयाचे

Advertisement

प्राध्यापक असलेले डॉ. सोलानो दा सिल्वा म्हणाले की, म्हादईवरील चर्चा दीर्घकाळ सिंचन अभियंते आणि कायदे पंडित यांच्यापुरती मर्यादित राहिली आहे. जेव्हा आपण नदीकडे फक्त पायाभूत सुविधा आणि न्यायालयीन खटल्यांच्या चौकटीतून पाहतो, तेव्हा ती ज्या सामाजिक जीवनाला आणि पर्यावरणीय काळाला आधार देते. ते आपल्या नजरेतून सुटते. अशा मर्यादित दृष्टिकोनामुळे जनसामान्यांची कल्पनाशक्ती आणि दीर्घकालीन जबाबदारी कमी होते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. पीटर आर. डीसूझा यांनी ‘द रीव्हर म्हादई : द सायन्स अॅण्ड पॉलिटिक्स ऑफ डायव्हर्जन’ या पुस्तकातील संशोधनाच्या आधारे नदीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन मांडले. त्यांनी म्हादईला एक आठवणींचा संग्रह, उपजीविकेचा आधार, परिसंस्थांचा वाहक, राजकीय संघर्षाचे केंद्र आणि भूगर्भीय इतिहासाची साक्षीदार अशी संज्ञा दिली. जर आपण नदीकडे फक्त वळवता येणारे पाणी म्हणून पाहिले, तर तिच्या प्रवाहाद्वारे महत्त्वाच्या गोष्टी वाहून जात आहेत, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.

गोव्यातील दैनंदिन सवयींमुळे नदीचे होत असलेले नुकसानही मांडण्यात आले. आपण नदीचे मालक नाही, आपण फक्त तिचे संरक्षक आणि पुढील पिढ्यांसाठी जबाबदार विश्वस्त आहोत, असे प्रा. डीसूझा म्हणाले. इतिहासतज्ञ प्रा. लक्ष्मी सुब्रमणियन यांनी म्हादई नदीला दीर्घकालीन सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाच्या संदर्भात मांडले. म्हादईसारखे वाद केवळ पाण्यापुरते नसून ते प्रशासन, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्याशी जोडलेले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

म्हादईच्या महत्त्वावर आधारित ‘माँ देई’ माहितीपट

सादरीकरणानंतर ’माँ देई’ माहितीपट दाखवण्यात आला. कर्नाटकात उगम पावून महाराष्ट्रातून वाहत गोव्यात अरबी समुद्रात मिळणाऱ्या म्हादई नदीच्या महत्त्वावर आधारित हा माहितीपट आहे.  यावेळी उपस्थितांना http://www.mhadeicollective.comया खुल्या डिजिटल व्यासपीठाचीही ओळख करून देण्यात आली. या संकेतस्थळावर पुस्तक, चित्रपट आणि संबंधित संशोधन साहित्य मोफत उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ सामायिक ज्ञानाचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले असून, धोरणात्मक बैठका आणि न्यायालयीन सुनावणींच्यापलीकडे जाऊन म्हादई नदीबाबत सार्वजनिक संवाद, चर्चा आणि पुढील संशोधनाला चालना देण्याचा त्याचा उद्देश आहे.

Advertisement
Tags :

.