For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलप्रभा नदीपात्राची खोली वाढवण्याची गरज

10:33 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मलप्रभा नदीपात्राची खोली वाढवण्याची गरज
Advertisement

खानापूर शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर : योग्य नियोजनाअभावी पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता

Advertisement

खानापूर : गेल्यावर्षी एकूणच पाऊस कमी झाल्याने संपूर्ण नदीपात्र आता कोरडे पडत चालले आहे. पाटबंधारे खात्याच्या अयोग्य नियोजनामुळे तालुक्यातील बंधाऱ्यातून  पाणी योग्य पद्धतीने अडवले नसल्याने पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. याचा परिणाम पिकांवर तसेच नागरीपुरवठा योजनेवर झाला आहे. त्यामुळे  खानापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला सध्या तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील नागरिक सध्या कूपनलिकेच्या आधारावरच अवलंबून आहेत. शहराच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी जुन्या चौदा मुशीच्या पुलाजवळ ब्रिजकम बंधाऱ्याची निर्मिती केली. मात्र योग्य नियोजनाअभावी या ठिकाणी पाणी साठण्याची क्षमता अवघ्या पाच वर्षातच कमी झाली आहे. यामागे दोन्हीकडील घाट तसेच बंधाऱ्याचे योग्य नियोजन नसल्याने या ठिकाणी अवघ्या पाच वर्षातच मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने पात्राची खोलीच एकदम कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झालेला आहे. परिणामी मार्च महिन्यातच पूर्णपणे पात्र कोरडे पडलेले आहे.

केवळ 16 फूट उंचीचा बंधारा बांधल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता झाली कमी

Advertisement

नवीन ब्रिजकम बंधारा बांधत असताना तो फक्त 16 फूट उंचीचा बांधण्यात आला. पहिल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होत होती. मात्र गाळ आणि वाळू पात्रात साचत असल्याने बंधाऱ्याच्या ठिकाणी पुन्हा पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पात्र कोरडे पडले आहे. यासाठी नव्या ब्रिजकम बंधाऱ्यापासून ते जॅकवेलच्यावर पाचशे मीटरपर्यंत नदीपात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने आतापासूनच नियोजन करून पुढील एक महिन्यात नदीपात्राची खोली वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. घाटाच्या ठिकाणी साठलेली वाळू काढून पात्र खोल करणे तसेच हत्ती गुंड्याजवळील कातळ फोडून खोली वाढवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्याचा विकास होणार आहे. त्यावेळी जॅकवेलजवळील असलेले पूल पाडवून नव्याने बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. या पद्धतीने ब्रिजकम बंधाऱ्यापासून 1 कि. मी. मलप्रभा नदीची खोली वाढवल्यास पाणी मोठ्या प्रमाणात साठवणूक होऊन पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

खोली वाढवण्यासंदर्भात प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचे काम

नदीपात्राची खोली वाढवण्यासंदर्भात पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता याबाबत भूगर्भ खात्याची आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची गरज असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्यात येत आहे. मात्र यासाठी पाटबंधारे खात्याकडून कोणताच पाठपुरावा करण्यात आलेला नाही. तालुक्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या मलप्रभा नदीवर आमटे, मळव, देवाचीहट्टी, असोगा, खानापूर, कुप्पटगिरी साखर कारखाना, यडोगा असे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांच्या वरील पात्रातील खोली वाढवून योग्य नियोजन करून पाणी अडवणे गरजेचे आहे. असे केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, आणि पिकांबरोबरच पाणीपुरवठा योजनेलाही मदत होईल, यासाठी येत्या काळात नियोजन होणे गरजेचे आहे.

आमदारांनी संबंधित खात्याची बैठक घ्यावी!

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत संबंधित खात्यांची तातडीने बैठक घेऊन बंधाऱ्याच्या ठिकाणी खोली वाढवण्यासाठी काय नियोजन करता येईल, यासाठी क्रम घेणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर बनलेला आहे. भविष्यातही पाण्याच्या योग्य नियोजनासाठी बंधाऱ्याच्या परिसरात खोली वाढवण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. आवश्यक ठिकाणी नव्याने बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

खानापूरला तीन दिवसाआड पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जॅकवेलपासून ते नवीन बंधाऱ्यापर्यंत पूर्णपणे पात्र कोरडे पडल्याने शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने जाहीर केले आहे. नदीच्या कोंडीतील साठलेले पाणी जॅकवेलमध्ये आणून हे पाणी शहराला पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र हे पाणी एक आठवडा पुरेल इतकेच असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. शहरात 250 हून कूपनलिका आहेत. त्याचे योग्य नियोजन नगरपंचायतीने करणे गरजेचे आहे. शहरातील कूपनलिकेच्या पाणी पातळीत घट झालेली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. यासाठी नगरपंचायतीने तातडीने नियोजन करून शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा शहराचा पाणीप्रश्न जटील बनणार आहे.

Advertisement
Tags :

.