‘संविधान हत्या दिवस’ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात येण्याची गरज
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत : मडगावच्या कारे कायदा महाविद्यालयात ‘संविधान हत्या दिवस’
मडगाव : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 साली संपूर्ण देशावर आणीबाणी लादली आणि लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळे पर्व’ सुरू झाले होते. याची माहिती आजच्या तरूण पिढीला नाही. त्यामुळे ‘संविधान हत्या दिवस’ हा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात येण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मडगावच्या कारे कायदा महाविद्यालयात काल बुधवारी ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे सर्वोतपरी आहे. त्याची हत्या कशी झाली, कधी झाली व कोणी केली याची माहिती आजच्या पिढीला कळली पाहिजे आणि त्या संविधानाची हत्या पुन्हा चुकूनसुद्धा कधी होता कामा नये, यासाठीच ‘संविधान हत्या दिवस’ पाठ्यापुस्तकात येण्याची गरज आहे. परंतु, अद्याप त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण, भविष्यात यावर आम्ही विचार करू असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कला व संस्कृती सचिव सुनील अंचीपाका, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर तसेच गोवा विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन कुंकळ्योकर व्यासपीठावर उपस्थित होते. संविधान हत्या केल्यास 50 वर्षे झाली. भविष्यात अशा प्रकारे संविधान हत्या होऊ नये यासाठीच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. ज्याच्या कुटुंबियांनी संविधानाची हत्या केली, तेच आज संविधानाचे पुस्तक खिशांत घालून फिरत आणि या संविधानाची हत्या होऊ शकते असे लोकांना सांगतात. खरे तर हा प्रकार वादग्रस्त आहे.
50 वर्षापूर्वी देशभरातील जनतेचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंतचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले. त्यावर कळस म्हणून ‘नसबंदी’ सारखा प्रकार या देशात घडला. वृत्तपत्रांची गळचेपी करण्यात आली होती. विरोधी पक्षनेत्यांची धरपकड करण्यात आली. जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत देशभराती लाखो नेत्यांना अटक करण्यात आली. हा प्रकार तब्बल 21 महिने सुरू होता. इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारवर जर कोणी क्षुल्लकसुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक केली जायची. देशभरात कायदा नावाचा प्रकारच नव्हता. देशभरातील जनता ही भयाच्या सावटाखाली जगत होती. गोव्यातसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते तसेच राष्ट्रवादी नेते यांनाही अटक झाली होती. त्यात दादा आर्लेकर, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, दत्ता भिकाजी नाईक, प्रभाकर सिनारी, गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी आणीबाणीच्या विरोधात आवाज उठविला त्या सर्वांना अटक करून 21 महिने तुरूंगात ठेवले होते. ही अटक मीसा कायद्याखाली करण्यात आली होती, असे मुख्यमंत्री यावेळी पुढे बोलताना म्हणाले. मडगाव हे त्यावेळी केंद्रस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात चालत होते. त्याच्यावर कारवाई झाली त्याचबरोबर गोव्यातही वृत्तपत्रावर कारवाई करण्यात आली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यावेळी आपण 21 वर्षांचा : आमदार दिगंबर कामत
लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळे पर्व’ 25 जून 1975 साली झाले. त्यावेळी आपण 21 वर्षांचा होतो. आज अनेकांना कल्पनाही नसेल की, ज्या दिवशी आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यावेळी मडगाव शहरात रवी जोगळेकर, वीर गौडा, अॅड. शानभाग इत्यादींना अटक करण्यात आली होती, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणातून दिली. अटल बिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांना अटक करून तुरूंगात टाकले. तेव्हा त्यांनी लिखाण केले. त्यांच्या लिखाणातून आणीबाणीची बरीच माहिती मिळते असे श्री. कामत पुढे बोलताना म्हणाले. आपल्या देशाचे संविधान हे संपूर्ण जगात सर्वोच्च दर्जाचे मानले आणि त्याचे शिल्पकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली होती. ती त्याची हुकूमशाही होती असे श्री. कामत म्हणाले. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या विद्यार्थ्यांनी देशावर आणीबाणी का लादली याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या निवाडाचाही त्यांनी अभ्यास करावा. न्यायालयात त्यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूषण सावईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शेवटी नितीन कुंकळ्योकर यांनी आभार मानले.