सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत एकजुटीने लढण्याची गरज
मनोज पावशे यांचे प्रतिपादन : बेळगुंदी येथे कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन, विविध मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर/किणये
जोपर्यंत भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार प्राप्त होत नाहीत. जोपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिकांना व मराठी भाषेला न्याय मिळत नाही. जोपर्यंत मराठी बहुभाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जात नाही. तोपर्यंत सीमालढा तेवत ठेवण हे प्रत्येक सीमावासियाचे आद्यकर्तव्य आहे. स्वत:च्या प्राणाची आहुती देणे, हा लढ्यातील परमोच्च त्याग असतो. तो सीमावासियांनी करूनसुद्धा गेली 69 वर्षे आपल्याला न्याय मिळत नाही. ही लोकशाहीची शोकांतिका आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी एकजुटीने लढणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
1986 साली कन्नड सक्ती लागू करण्यात आली. या कन्नड सक्तीला सीमावासियांनी प्रखर विरोध केला. या आंदोलनात बेळगुंदी गावातील भावकू चव्हाण, माऊती गावडा, कल्लाप्पा उचगावकर हे दि. 6 जून 1986 रोजी हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना शुक्रवारी सकाळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगुंदी ग्रामस्थ व शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोज पावशे बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या 69 वर्षांपासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. सीमा आंदोलनात अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवासही भोगला आणि हुतात्मेही पत्करले. या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्र्रद्धांजली ठरणार आहे.
प्रारंभी भावकू चव्हाण, माऊती गावडा व कल्लाप्पा उचगावकर या हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, असे किरण मोटणकर यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी जे हुतात्मे झाले आहेत. त्यांचे स्मरण साऱ्यांनीच ठेवले पाहिजे, असे शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करताना बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी सांगितले. यावेळी अर्जुन चौगुले व इतरांची भाषणे झाली. राजकुमार बोकडे, परशराम पाटील, ज्योतिबा उचगावकर, रमेश माळवी, अनिल पाटील, सुनील पाटील, पुंडलिक सुतार, महेश पाऊसकर आदींसह तालुक्मयाच्या विविध गावातील कार्यकर्ते व बेळगुंदी विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.