For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर बसस्थानकाशेजारुन रस्ता करण्याची गरज

10:31 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर बसस्थानकाशेजारुन रस्ता करण्याची गरज
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नांची गरज : मान्यवरांकडून तीव्र प्रतिक्रिया

Advertisement

खानापूर : खानापूर येथील नव्याने बांधकाम करण्यात येत असलेल्या हायटेक बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसात या बसस्थानकाचे काम पूर्ण होणार आहे. बसस्थानकासाठी गायरानची जागा देण्यात आली होती. सध्या जुन्या बसस्थानकाच्या समोरच नवीन बसस्थानक उभारण्यात येत आहे. पूर्वीच्या आराखड्यात बसस्थानक आणि आंबेडकर गार्डनच्या बाजूने 20 फुटाचा रस्ता सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र तत्कालीन राजकीय हस्तक्षेपामुळे हा रस्ता बाहेरच्या बाजूने वळविण्यात आला. त्यामुळे खानापूरच्या विकासाला बरीच खिळ बसली आहे. हा रस्ता करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत ठोस भूमिका घेऊन बसस्थानक आणि आंबेडकर गार्डनच्या बाजूने नव्याने रस्ता करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या नव्याने बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे तत्कालीन राजकीय हस्तक्षेपामुळे बंद केलेला रस्ता सुरू केल्यास गुरव गल्ली, घाडी गल्ली, जुना मोटरस्टँड, बस्ती गल्ली, बाजारपेठ, केंचापूर गल्ली, होसमणी गल्ली, लक्ष्मीनगर, बुरुड गल्ली, कडोलकर न्यू नाईक गल्ली, नाईक गल्ली यासह इतर गल्ल्यांतील नागरिकांना हा रस्ता सोयीचा होणार आहे. यासाठी नगरपंचायतीच्या आंबेडकर उद्यानाच्या बाजूने तसेच मागे असलेल्या स्मशानभूमीच्या शेजारुन आणि बसस्थानकामधून हा रस्ता करणे गरजेचे आहे. अशी शहरवासियांची मागणी आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या रस्त्यासाठी अग्रक्रम देवून वेळ न घालवता तहसीलदार, नगरपंचायत, केएसआरटीसी आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेऊन यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांचीही बैठक घेऊन याबाबत विचार विनिमय होणे आवश्यक आहे.

शहराच्या विकासासाठी हा रस्ता करणे आवश्यक

Advertisement

ज्येष्ठ नागरिक प्रकाश चव्हाण

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता होणे आवश्यक आहे. तत्कालीन राजकर्त्यांच्या चुका झाल्या असल्या तरी त्याचा विचार न करता शहराच्या विकासासाठी तसेच नागरिकांचा विचार करून हा रस्ता करणे गरजेचे आहे. तालुक्याच्या विकासाबाबत राजकीय पक्षभेद बाजूला सारुन विकासासाठी जे योग्य आहे. त्यासाठी निश्चित समर्थन केले जाईल, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत पाठपुरावा केल्यास आम्ही निश्चित सहकार्य करू.

तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल

हा रस्ता झाल्यास अर्ध्या खानापूर शहराच्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्यासाठी याबाबत शासकीय पातळीवर जे काही प्रयत्न करता येतील, त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू,

नगरसेवक लक्ष्मण मादार

शहवासियांच्या सोयीसाठी तसेच भविष्याचा दृष्टिकोन ठेवून विचार केल्यास हा रस्ता होणे खरच गरजेचा आहे. यासाठी शहरवासियांना आम्ही सहकार्य करू.

ग्रा. पं. सदस्य संघटनाध्यक्ष विनायक मुतगेकर

ज्यावेळी बसस्थानक तयार झाले. त्याचवेळी या रस्त्याबाबत चर्चा झाली होती. मात्र तत्कालीन राजकीय हस्तक्षेपामुळे हा रस्ता बंद करण्यात आला. यामुळे प्रवाशांची तसेच खानापूरवासियांची मोठी गैरसोय झाली आहे. आता बसस्थानकाचे काम सुरू आहे. यासाठी आमदार हलगेकर यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हा रस्ता झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनाही बाजारपेठ तसेच शहरात संपर्क करणे सोयीचे होणार आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी

जेंव्हा नवीन बसस्थानकाचे काम सुरू झाले. त्याचवेळी आम्ही माजी आमदार अंजली निंबाळकर यांना प्रत्यक्ष भेटून या रस्त्याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी माजी आमदार निंबाळकर यांनी आपण हा रस्ता करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असे आश्वानसही दिले होते. हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याने आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करत आहोत. हा रस्ता झाल्यास खानापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे होणार आहे.

Advertisement
Tags :

.