खरेदी केंद्रांवरील नियमांमध्ये शिथिलतेची गरज
बेळगाव जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद नाही
बेळगाव : खराब बियाणे, खतांचा तुटवडा व अतिवृष्टी झाली असली तरी शेतकऱ्यांनी पिकविलेले पीक हाताशी आले आहे. मात्र काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत उत्पादन विकणे कठीण बनले आहे. पावसामुळे मूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीनच्या पिकांवर परिणाम झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. खरेदी केंद्रे सुरू असली काही नियम जारी केल्याने बहुतांश शेतकरयांनी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असून खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विक्री करत असल्याचे समजते. यामुळे नियमांमध्ये शिथिता आणून शेतकऱ्यांना अनुकूल करून देण्याची मागणी होत आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यापासूनच मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल आदी उत्पादनाची एमएसपीअंतर्गत खरेदी सुरू केली आहे. सोयाबीन 383, उडीद 130, सूर्यफूल 117 व मूग खरेदीसाठी 288 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रे सुरू करून महिना उलटला तरी मोजक्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करतील, या उद्देशाने मोठ्या संख्येने खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सध्यातरी शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने राज्य डाळी विकास मंडळ व राज्य सहकारी विक्री महामंडळ यांची खरेदी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर पिकांची विक्री करण्यासाठी फ्रुट्स आयटी बंधनकारक करण्यात आली असून शेतकरी केंद्रावर न येण्याची विविध कारणे असल्याचे समजते. उत्पादन एफएक्यू दर्जाचे असावे, चांगल्या दर्जाच्या पोत्यांमध्ये धान्य घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी केली असली तरी एफएक्यू व योग्यरित्या खरेदी केंद्रावर धान्य घेऊन गेल्यास ते नाकारले जात आहे. यामुळे बहुतांश शेतकरी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, मका, सूर्यफूल, उडीद आदी पिकांत पाणी आल्याने प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट ओढावले. पण तरीदेखील पावसाचा जोर कायम असल्याने दुबार पेरणीही संकटात आली. मात्र शेतकऱ्यांनी पिकांची योग्य देखभाल केल्याने पीक हाताशी आले. मात्र यंदा पावसामुळे अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी झाले. सरकारकडून खरेदी केंद्रासाठी नियमावली जारी केल्याने शेतकऱ्यांनी एमएसपीअंतर्गत खरेदी होत असूनही पाठ फिरविली आहे.
पावसामुळे मूग व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे पिकांची गुणवत्ता खालावली. सततच्या पावसामुळे धान्य योग्यरित्या वाळत नाही. परिणामी धान्याची गुणवत्ता खालावल्याने पीक निकृष्ट दर्जाचे मानले जाते. तसेच खरेदी केंद्रावर एफएक्यूमुळे धान्य नाकारले जात आहे. पावसाशी दोन हात करून पिकविलेले धान्य खरेदी केंद्रांवर येऊन विक्री करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खरेदी केंद्रांवर जाऊन धान्यांची एमएसपीअंतर्गत विक्री करण्यासाठी प्रुट्स आयडी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त धान्य एफएक्यू दर्जाचे असणे बंधनकारक आहे. यामुळे बहुतांश शेतकरी नोंदणी करण्याकडे कानाडोळा करत आहेत. बेळगाव, बिदर, धारवाड, गदग, रायचूर आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. सदर नियमांमुळे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. राज्यातील बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे चित्र असल्याचे समजते. यामुळे सरकारने नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.