योग्य नियोजनाची गरज : निखिल चोप्रा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. अलिकडच्या कालावधीत भारतीय कसोटी संघाची मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मालिकेत जबरदस्त पिछेहाट झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मालिकेसाठी भारतीय संघाला परिपूर्ण नियोजनाची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन माजी क्रिकेटपटू निखिल चोप्राने केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ दिग्गज म्हणून ओळखले जातात. अलिकडच्या कालावधीत या दोन संघामध्ये झालेल्या मालिकांमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर निश्चितच वरचढ असल्याचे दिसून आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध यापूर्वीच्या सलग चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामध्ये 2018-19 तसेच 2020-21 च्या क्रिकेट हंगामातील मालिकांचा समावेश आहे. बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेच्या आतापर्यंत झालेल्या इतिहासात भारताने 10 वेळा तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा हा चषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने बॉर्डर-गावसकर चषक यापूर्वी म्हणजे 2004-05 साली भारतात जिंकला होता. भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू सध्या बॅडपॅचमधून जात असल्याने निवड समितीला चिंता वाटते. कर्णधार रोहित शर्मा तसेच विराट कोहली यांची न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने भारतीय संघाला या आगामी मालिकेसाठी अचूक नियोजनाची जरुरी असल्याचे निखिल चोप्राने म्हटले आहे. उभय संघातील दुसरी कसोटी 6 ते 10 डिसेंबर दरम्यान अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. ही दुसरी कसोटी दिवसरात्रीची खेळविली जाणार आहे. तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळविली जाईल. या मालिकेतील चौथी कसोटी मेलबोर्न येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होईल. ही कसोटी बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखली जाते. या शेवटची आणि पाचवी कसोटी सिडनीत 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी बुमराहकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
भारतीय संघ: रोहीत शर्मा (कर्णधार), बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव ज्युरेल, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रे•ाr आणि वॉशिंग्टन सुंदर.