आत्मनिर्भरतेसाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या खाद्यतेल वर्षात 1. 31 लाख कोटी रुपये मोजून 159.5लाख टन खाद्य तेलाची आयात केली. मागील वर्षीही 164.7 लाख टन खाद्य तेलाची आयात झाली होती. त्यापोटी 1.38 लाख कोटी रुपये देशाला मोजावे लागले होते. दिवाळीच्या तोंडावरच खाद्यतेल दराचा भडका उडाला होता. खाद्य तेलात आत्मनिर्भरता साध्य व्हावी म्हणून राष्ट्रीय खाद्य तेल मिशन सुरु करण्यात आले आहे. हजारो कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय तेलबिया मिशनही राबवण्यात आले पण आयात कांही कमी होताना दिसत नाही.
2022-23 दरम्यान भारताने 16.5 दशलक्ष टन इतके खाद्यतेल आयात केले होते तर भारतात 10.3 दशलक्ष टन इतके देशांतर्गत पातळीवर उत्पादीत केले होते. 2023-24 च्या तेल विपणन वर्षात खाद्यतेलाची आयात घसरणीत होती. 159.6 लाख टन इतके खाद्यतेल त्यावर्षी आयात केले गेले. सप्टेंबरमध्ये सरकारने आयात तेलाच्या करात वाढ केली, जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यातही पाम तेलाची आयात ही इतर तेलांच्या तुलनेत निम्मी 56 टक्क्याहून अधिक राहिली आहे. तेल उत्पादनाच्याबाबतीत भारताला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
शेती उत्पादनात आत्मनिर्भर असलेला आपला देश आता बाहेरच्या देशातून येणाऱ्या आयातीवर निर्भर झाला आहे. जपानमधून कांदा आला. मोझंबीकमधून तूर डाळ, म्यानमारमधून उडीद डाळ, अमेरिका, रशिया, नेपाळ आणि मोरक्को येथून टोमॅटो आणि इंडोनेशिया, मलेशिया येथून पाम तेल आणि युक्रेन, अर्जेंटिना, ब्राझील येथून सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल तसेच कॅनडामधून कडधान्ये आणि चीन, मलेशिया आणि आखाती देशातून खते आणि चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कपडे, चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम तसेच रशिया, चीन, अमेरिका आणि ब्राझील येथून कागद मागवला जातो. बाजारात आपल्या फळांपेक्षा इराण, इजिप्त, न्यूझीलंड, चिली, अमेरिका आणि व्हिएतनाम येथील फळे जास्त दिसू लागली आहेत आणि सुका मेवा तर अमेरिका, इराण आणि पाकिस्तान येथून मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात येऊ लागला आहे. कांद्याचा किरकोळ बाजारात दर आता किलोस 80 रुपये झाला आहे. जास्त पाणी असलेला आणि थोडा खराब झालेला कांदा 60 रुपये प्रतिकिलोने विकला जातो आहे. रोज स्वयंपाकघरात मुक्त हस्ते वापरला जाणारा कांदा बाजारातून विकत आणताना ग्राहकांच्या डोळ्यांत मात्र पाणी आणतो आहे. किमान महिनाभर तरी कांद्याचे भाव चढेच राहणार आहेत. खरीपात आलेला कांदा अवकाळी पावसाने सडला. कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरवर्षी 270 लाख टन कांद्याच्या उत्पादनापैकी 60 लाख टन कांदा वाया जातो. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांकडे असलेला उन्हाळी कांदा संपला आहे. यामुळे आवक कमी होत असल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडल्याचे दिसते आहे. लसूणचे दरही किलोस चारसौ पार गेले आहेत. आणखीन किमान तीन महिने तरी लसणाचे दर चढेच राहणार आहेत. शेतकऱ्यांचे भले तर झालेच नाही शिवाय ग्राहकही भरडला गेला आहे. पुरवठा साखळीचे व्यवस्थापन सरकारला कधीच जमले नाही. शिवाय धरसोड आयात-निर्यात धोरणामुळे आत्मनिर्भरता म्हणजे निव्वळ गाजराची पुंगी झाली आहे. वाजली तर छानच नाही तर मोडून खाल्ली असेच धोरण दिसते. आत्मनिर्भरतेचा प्रचार जास्तच झाला पण प्रत्यक्षात काम नियोजनबद्धरीत्या झाले नाही. त्यामुळे आयातीवर निर्भरता वाढतच चालली आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर