आदिवासी युवकांमध्ये संस्कृती जतनासंबंधी जागरुकतेची गरज
अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतारसिह यांचे मत
पणजी : आदिवासी समाजातील तऊणांनी मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग घेतल्यास त्यांचा विकास आणि प्रगती होण्यास हातभार लागणार आहे. त्यादृष्टीने आदिवासी युवकांमध्ये त्यांची संस्कृती जतनासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतारसिंह आर्य यांनी व्यक्त केले. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ज्येष्ठ सदस्य निऊपम चकमा आणि डॉ. आशा लाकरा यांचीही उपस्थिती होती. तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्या या आयोगाने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विविध समस्या आणि प्रगतीचा राज्य सरकारकडून आढावा घेतला. त्याचबरोबर अनेक महत्वपूर्ण सूचनाही राज्य सरकारला केल्या आहेत. या सर्व सूचना आणि अभिप्रायांचे दस्तावेजीकरण करण्यात आले असून त्यासंबंधी शिफारस अहवाल तयार करून राष्ट्रपतींना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्य यांनी दिली.
खास करून गोवा राज्यात आदिवासी लोकांना जमिनदारांकडून ना हरकत दाखले मिळविण्यात अडचणी येतात. परिणामी त्यांना विविध सरकारी योजना आणि अन्य लाभ मिळविण्यात अडचणी येतात. त्यासाठी आदिवासींना जमिनीचे मालकी हक्क प्रदान करण्याबाबतही आयोगाने राज्य सरकारला सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, असे आर्य यांनी सांगितले. दरम्यान, या पत्रकार परिषदेपूर्वी दिवसभरात घेतलेल्या बैठकांच्या माध्यमातून आयोगाने अनुसूचित जमातींचे कल्याण आणि विकासासाठी केंद्र सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या विविध सुविधा, सुरक्षा आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव डॉ व्ही. कंदवेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्यासह अनुसूचित जमाती आयोगाचे अधिकारी आणि अन्य विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.