होर्मुझ संकटासाठी स्थायी तोडग्याची आवश्यकता
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्या--हू यांनी मांडली योजना : सौदी, युएई, कतारची मान्यता आवश्यक
होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या संकटाच्या स्थायी तोडग्याची आवश्यकता आहे. याचा दीर्घकालीन तोडगा नवी ऊर्जा पाइपलाइन निर्माण करणे असेल, जी आखाती देशांचे कच्चे तेल आणि गॅसला भूमध्य समुद्रापर्यंत नेईल असे उद्गार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी काढले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुज सामुद्रधुनीच्या मार्गावरील तेल-गॅस वाहतूक रोखली असताना नेतान्याहू यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अनेकदा धमकाविले असले तरीही होर्मुझवरील तेहरानचा दबदबा मोडून काढण्यास ते यशस्वी ठरलेले नाहीत.
होर्मुझ सामुद्रधुनीचा दीर्घकालीन तोडगा ऊर्जा पाइपलाइन्सचा मार्ग बदलून त्यांना पश्चिमेकडे म्हणजेच सौदी अरेबियातून लाल समुद्र आणि भूमध्य समुद्रापर्यंत नेणे आहे. यामुळे इराणचा भौगोलिक चेकपॉइंट पूर्णपणे टाळता येणार आहे. इराणची स्थिती होर्मुझवर मजबूत असल्याने दुसरा मार्ग शोध योग्य रणनीति ठरेल असे नेतान्याहू यांनी स्वीकारले आहे.
रणनीतिक महत्त्व संपविण्याचा पर्याय
होर्मुझ सामुद्रधुनीतून जागतिक तेल निर्यातीचा 20 टक्के हिस्सा जातो. आखातातून अनेक देशांना याच मार्गाने तेल अन् गॅस पोहोचतो. सौदी अरेबिया, युएई आणि ओमानचे जलक्षेत्र होर्मुझच्या सामुद्रधुनीत येते, परंतु होर्मुझच्या दुसऱ्या किनाऱ्यावर इराणच्या उपस्थितीने याला सागरी वाहतुकीसाठी संवेदनशील केले आहे. इराणने होर्मुझचा अस्त्र म्हणून वापर केला आहे. जगात ऊर्जा संकट निर्माण करण्याचा इराणचा प्रयत्न आहे. होर्मुझवरून कुठलाही यशस्वी सैन्यतोडगा केवळ अल्पकालीन स्थिरता देऊ शकतो. अशास्थितीत सामुद्रधुनीचे रणनीतिक महत्त्व संपविणेच दीर्घकालीन तोडगा ठरणार असल्याचे नेतान्याहू यांचे सांगणे आहे.
इराण युद्धात निम्मी उद्दिष्ट पूर्ण
इराणसोबतच्या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेला आघाडी मिळाली असून लढाईचा निम्म्याहून अधिक टप्पा पार पडला आहे. इस्रायलचे सैन्य इराण शासनाच्या आण्विक क्षमतांना नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. परंतु युद्ध कधीपर्यंत संपू शकते हे मी सांगू शकत नाही. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतांना कमकुवत केले असून देशाच्या प्रमुख आण्विक वैज्ञानिकांना संपविले आहे. अण्वस्त्र प्राप्त करण्याचे आणि अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याचा इराणचा प्रयत्न आहे. परंतु इराणला याप्रकरणी यशस्वी होऊ दिले जाणार नसल्याचे उद्गार नेतान्याहू यांनी काढले आहेत.