महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शरमेने मान खाली

06:48 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकत्ता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील एका महिला डॉक्टर प्रशिक्षणार्थीवर ज्या क्रूर पद्धतीने लैंगिक अत्याचार करून निर्घुण पद्धतीने तिला ठार करण्यात आले, तो प्रकार म्हणजे या संपूर्ण देशातील जनतेची मान खाली घालावयास लावणारा म्हणावा लागेल. ही घटना गेले आठ-दहा दिवस संपूर्ण देशभरात आणि जगात सर्वत्र गाजते. हा देश जगात सर्वात अग्रेसर संस्कृती संवर्धन, परंपरा जतन करणारा आणि संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण करणारा म्हणून सुप्रसिद्ध आहे. अशा या देशात महिलांवर होणारे अत्याचार ऐकून मन सुन्न होते. कोलकाता येथील हे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात मुंबईजवळ बदलापूर येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी दोन छोट्या कोवळ्या चार वर्षाच्या बालिकांवर शाळेच्या एका कर्मचाऱ्याकडून झालेल्या अत्याचाराने आणखीन एक जोरदार हादरा बसला. आपण जगासमोर, या देशातील सुजाण नागरिकांसमोर काय निर्माण करीत आहोत, असा प्रश्न आपल्यासमोर पडतोय. देशातील महिलांवर सध्या होत असलेले अत्याचार पाहिल्यानंतर शिसारी येते आणि संताप निर्माण होतो. देशात कोलकाता येथील घटनेने आपल्या भारतीय संस्कृतीला हरताळ फासला गेला. कोलकाता येथील ज्या डॉक्टर महिलेवर अत्यंत निर्घुण पद्धतीचे अत्याचार करण्यात आले त्यातून आपल्याला आपण भारतीय आहोत याची लाज वाटावी, असा हा अत्याचार आहे. अनेकांच्या शरीरात अत्याचाराची बीजे पेरली जात आहेत आणि त्यातून हे अत्याचारी राक्षस निर्माण होत आहेत. कोलकाता येथील प्रकार आणि 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार हे सर्व प्रकार अत्यंत घृणास्पद आहेत आणि निषेधाचे कोणत्याही स्तरावरचे शब्द वापरले तरी ते कमीच पडतील. बदलापूर येथील घटनेने त्या भागात मंगळवारी तमाम बदलापूरमधील जनतेने आदर्श शिक्षण संस्थेवर जोरदार हल्ला चढवला. रेल्वेस्थानक बंद पाडले. हजारोंच्या संख्येने नागरिक शाळेवर चाल करून गेले. रस्ते बंद केले आणि शाळेला आग लावण्यापर्यंत नागरिकांनी कायदा हातात घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी जनतेची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केले. संबंधित शाळेच्या मुलांची जबाबदारी पाहणाऱ्या दोन सेविकांना सेवेतून कमी केले. संबंधित परिसरातील पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली देखील केली. संबंधित संस्थाचालकांवर कडक कारवाईचे आदेशही दिलेत. एवढे करून न राहता फडणवीस यांनी हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात उभे करून संबंधित व्यक्तीविऊद्ध होईल तेवढी कडक कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. तरीदेखील बदलापूरची जनता संबंधित व्यक्तींचा बदला घेण्याचा आग्रह धरीत आहे. एकंदरीत या देशात महिलांवर होणारे वाढते अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही हे लक्षात आल्यानंतर आता यानंतर महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविऊद्ध अरब राष्ट्रांमध्ये जशी कडक शिक्षा दिली जाते तशीच कडक शिक्षा देण्याची तरतूद भारताला देखील यानंतर करावी लागेल असे दिसते. संपूर्ण देश कोलकाता येथील घटनेने अक्षरश: हादरला. संबंधित आरोपी विऊद्ध पश्चिम बंगालचे सरकार कडक कारवाई करण्यास राजी नव्हते, मात्र जनताच आक्रमक झाली आणि देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत राहिले. पश्चिम बंगालमध्ये गेले आठ दिवस लैंगिक अत्याचाराविरोधात मोर्चे, आंदोलने, जाळपोळ, दगडफेक, अश्रुधुरांच्या नळकांड्या वगैरे अत्यंत स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे याची जाग न्यायालयांना देखील आली आणि न्यायालयाने हे प्रकरण गंभीर पद्धतीने हाताळण्यास प्रारंभ केलेला आहे. असे असले तरी अशी प्रकरणे यानंतर घडू नयेत आणि ज्यांनी हे अत्याचार केलेले आहेत त्यांना एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे की ही शिक्षा पाहून यानंतर कोणालाही स्त्रियांवर अत्याचार करण्याचे धाडस होऊ नये. जो कोणी धाडस करील तो आपल्या प्राणास मुकणार, एवढेच त्या व्यक्तीच्या ध्यानात येणे गरजेचे आहे. त्यासाठीच होतील तेवढी कडक प्रावधाने भारतीय महिला संरक्षण कायद्यात निर्माण करणे आवश्यक आहे. संपूर्ण देशाला, देशाच्या संस्कृतीला, देशाच्या तत्त्वांना काळीमा फासणाऱ्या या नराधमांना आयुष्यभर पश्चाताप होईल अशा पद्धतीची शिक्षा तीदेखील सार्वजनिकरित्या होणे आवश्यक आहे. बंगालमधील घटनेमध्ये जे काही झाले आहे त्या संदर्भात दुर्दैवी महिलेचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर एकापेक्षा एक थरकाप उडवणाऱ्या बाबी उघड होत आहेत. त्यामुळे अशा नराधमाला केवळ आयुष्यभर तुऊंगात ठेवून नव्हे तर होईल तेवढे अत्याचार त्या व्यक्तीवर करून त्याला संपविणे आवश्यक ठरेल. त्याला केवळ भारतातच नव्हे या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार मुळीच असू नये. बदलापूर येथील घटनेमध्ये शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने ज्या चिमुरड्या बालिकांवर अत्याचार केले त्यासही अशाच पद्धतीची कडक शिक्षा व्हावी. या देशाचे जगात सर्वत्र नाव आहे आणि देशात महिलांना देवीचे स्वरूप मानले जाते. आपल्या धर्मात महिलांना फार आदर्श आणि आदरयुक्त असे स्थान आहे. देशात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. महिलांनी असा कोणता गुन्हा केला आहे की ज्यामुळे आज त्यांच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीचे अत्याचार होत आहेत. महिलांकडे असलेले नैसर्गिक सौंदर्य हा शाप ठरतोय अशी आजची स्थिती आहे. बिघडत चाललेली आजची पिढी आणि त्यातून होत असलेले अत्याचार दुराचार याचे मुख्य कारण म्हणजे संस्काराचा अभाव आहे. आज देशात आपण आपल्याच संस्कार पद्धतीवर हसतो, आपले संस्कार हाच एक टीकेचा विषय बनतोय, मात्र आपल्या संस्कृतीने असा दुराचार करायला आपल्याला कधीही शिकवलेले नाही. संस्कारापासून नवीन पिढी दूर जाते आणि विदेशी संस्कार तसेच भ्रमणध्वनीद्वारे लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप्स यातून काहीजणांना मिळणारी प्रेरणा इथूनच बिघडत्या वातावरणास प्रारंभ होतो आणि त्यातून अत्याचार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. ते रोखण्यासाठी जोपर्यंत कडक शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत कायद्याचा धाक उपयोगी पडत नाही. म्हणूनच या दोन घटनांनी संपूर्ण देशात जी जागृती निर्माण होतेय त्यातून किमान कडक शिक्षेची तरतूद तरी होईल असे वाटते. या गुह्यांचे मूळ आता शोधून काढावेच लागेल. एक महिला ही आई असते, बहीण, पत्नी असते. मैत्रीण असते मावशी असते. अशी अनेक नाती ती निर्माण करीत असते. अत्याचार करणारे पुऊष जन्म घेतात तो देखील एका महिलेच्या उदरात. त्यामुळे या पवित्र नात्याचा जरूर विचार एकदा तरी मनात येणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच भारतीय संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज संस्कारापासून माणसे दूर भरकटत जात आहेत.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article