‘नीट-युजी’ परीक्षा 17 जुलै रोजीच
18 लाख विद्यार्थ्यांना धक्का, लांबणीवर टाकण्याची याचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा-2022 (नीट-युजी परीक्षा-2022) नियोजित वेळापत्रकानुसारच घेतली जाणार असल्याचे गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. परीक्षा नियोजित तारखेला म्हणजेच 17 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मेडिकलची तयारी करणाऱया उमेदवारांच्या वतीने नीट-युजी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर याचिकार्त्यांची मागणी फेटाळण्यात आली. तथापि, न्यायालयाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
17 जुलै रोजी होणारी 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. सदर याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायालयाने ती कायम ठेवण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याचिकाकर्ते विद्यार्थी असल्याने त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेत नसल्याचे सांगताना ‘जर विद्यार्थी वगळता अन्य कोणीही याचिका दाखल केली असती तर संबंधिताला मोठा दंड ठोठावला असता’ असेही न्यायालयाने फटकारले. भविष्यात अशाप्रकारच्या याचिका दाखल झाल्यास दंड आकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नियमांचे पालन बंधनकारक
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नीट-युजी परीक्षा पुढे ढकलली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही परीक्षा 17 जुलै रोजीच होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक उमेदवाराला ‘एनटीए’ने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. परीक्षा आयोजित करणाऱया नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि डेस कोड असलेली यादी जारी केली आहे. यावषी 18 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आपले नशीब आजमावत आहेत.
नीट-युजी परीक्षेद्वारे अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा रविवार, 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी 18 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यातील मोठय़ा संख्येने विद्यार्थी अनेक दिवस परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. त्याच पार्श्वभूमीवर काही परीक्षार्थींनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. नीट-युजी परीक्षेसाठी परदेशात आणि देशातील विविध शहरांमध्ये सुमारे 3,500 परीक्षा केंदे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा एक दिवसही पुढे ढकलल्यास मोठी समस्या निर्माण होईल. 18 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील, असे सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून सांगण्यात आले. ही परीक्षा 497 शहरांमध्ये घेतली जाणार आहे.