अमेरिकेत तब्बल 5,000 उड्डाणे रद्द
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील हवाई वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. गेल्या 38 दिवसांपासून येथे ‘शटडाऊन’ सुरू असल्यामुळे अनेक कामगारांना वेतनाविना काम करावे लागत आहे. याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर झालेला दिसून येतो. शुक्रवारी 5,000 हून अधिक उड्डाणे रद्द किंवा विलंबित करण्यात आली होती. एका महिन्यापेक्षा जास्त काळ पगाराशिवाय काम करणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रकांची कमतरता दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने गुरुवारी 40 प्रमुख विमानतळांवर उड्डाण कपातीची घोषणा केली होती. यामध्ये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन यासारख्या देशातील सर्वात व्यस्त विमानतळांचाही समावेश होता. वीकेंडच्या सुट्ट्यांपूर्वी विमानसेवा कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी आधीच उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये प्रादेशिक आणि प्रमुख उड्डाणे समाविष्ट आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सध्या नियोजित वेळेनुसार सुरू असल्याचे समजते.