स्मृती मानधना अग्रस्थानाच्या समीप
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने अग्रस्थानाच्या समीप झेप घेतली आहे. या यादीत स्मृती सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्मृती मानधना या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. अलिकडेच आयर्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत स्मृती मानधनाने आपल्या फलंदाजीत सातत्य राखताना पहिल्या सामन्यात 41, दुसऱ्या सामन्यात 73 तर तिसऱ्या सामन्यात 135 धावा जमविल्या. 28 वर्षीय मानधना या मानांकन यादीत 738 मानांकन गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलव्हर्ट 773 गुणासह पहिल्या तर लंकेची चमारी अट्टापटू 733 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघातील जेमीमा रॉड्रिग्जने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आपले वनडेतील पहिले शतक झळकाविल्याने ती आता या यादीत सतराव्या स्थानावर, कर्णधार हरमनप्रीत कौर पंधराव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकनात भारताची दिप्ती शर्मा 344 गुणासह सहाव्या स्थानवर असून ऑस्ट्रेलियाची गार्डनर अग्रस्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकनात सोफी इक्लेस्टोन पहिल्या स्थानावर असून भारताची दिप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे.