Kolhapur Crime: आंबेवाडीजवळ टेम्पोसह 11 लाख 83 हजारांची विदेशी दारु जप्त, गुन्हा नोंद
ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील आंबेवाडी (ता. करवीर) गावानजीक बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेला एक मालवाहतूक टेम्पो पोलिसांनी पकडला. टेम्पो चालकासह त्याच्या साथिदाराला अटक करीत, त्याच्याकडून 3 लाख 83 हजार 456 रुपये किंमतीची विदेशी दारू आणि 8 लाख रूपये किंमतीचा मालवाहतूक टेम्पो असा 11 लाख 83 हजार 456 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या संशयितामध्ये विशाल रमेश कांबळे (वय 30, रा. वाकरे, ता. करवीर), युवराज महादेव पाटील (वय 45, रा. नणंद्रे, ता. पन्हाळा) या दोघांचा समावेश आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली आहे. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एलसीबीच्या पोलीस अधिकारी व अमंलदारांची अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेगळी पथके तयार केली आहेत.
या पथकातील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी व सचिन जाधव यांना कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावरुन बेकायदेशीरपणे विदेशी दारुची मालवाहतूक टेम्पोमधून वाहतूक करण्यात येत आहे. अशी बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी आंबेवाडी (ता. करवीर) गावानजीक बुधवारी रात्री सापळा रचला.
बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेले विशाल कांबळे, युवराज पाटील या दोघांना एका मालवाहतूक टेम्पोसह पकडले. त्याच्याकडून 3 लाख 83 हजार 456 रुपये किंमतीची विदेशी दारू आणि 8 लाख रूपये किंमतीचा मालवाहतूक टेम्पो असा 11 लाख 83 हजार 456 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या विशाल कांबळे, युवराज पाटील या संशयीताकडे पोलिसांनी जप्त केलेल्या विदेशी दाऊ कोठू आणि कोणाकडून आणली. त्याची विक्री कोठे करण्यात येणार आहे. याविषयी चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान या दोघा संशयितांनी विदेशी दारु कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील रोहीत वाईन्स येथून खरेदी केल्याचे व बांबवडे (ता. शाहूवाडी ) येथील टर्निंग पाईंट नावाच्या हॉटेलमध्ये आणि मैत्री हॉटेल येथे विक्री करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले.