कराडला एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक
कराड :
पावसाळ्याच्या काळात उद्भवणारी आपत्ती व पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी कराडचे प्रशासन सज्ज झाले असून एनडीआरएफ, महसूल प्रशासन व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रीतिसंगमावर प्रात्यक्षिक राबवण्यात आले. तसेच सर्व विभागातील बोटी व आपत्ती व्यवस्थापनातील साहित्याची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी नागरिकही उपस्थित होते.
कृष्णा व कोयना नदीच्या काठावर वसलेल्या कराड शहरासह तालुक्यात पावसाळ्याच्या काळात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पावासाळ्याच्या काळात नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतरीत करण्याबरोबरच प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्यात येते. त्यानुसार १ जूनपासून कराड तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती कायान्वित करण्यात आली आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या काळात उद्भवणाऱ्या आपत्ती व पूर परिस्थितीवर ही समिती २४ तास लक्ष ठेवून असणार आहे. काही दिवसांपूर्वी कराडला एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या जवानांनी शहर व तालुक्यातील पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागाची पाहणी केली आहे. पाऊस काळात कराड व पाटण तालुक्यातील पूरस्थितीत ही तुकडी मदतकार्य करणार आहे.
तसेच मान्सून कालावधीत संभाव्य पुराच्या धोक्याचे अनुषंगाने तहसील कार्यालय, नगरपरिषद व एनडीआरएफ पथक यांचे संयुक्त विद्यमाने प्रीतिसंगम, कृष्णा घाट येथे शोध व बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. त्यावेळेस सर्व विभागातील बोटींची व आपत्ती व्यवस्थापनातील साहित्याची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान व महसूलचे अधिकारी व कर्मचारी तसेच कराड नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.