तामिळनाडूत रालोआचे जागावाटप पूर्ण
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांनी त्यांच्यातील जागावाटप पूर्ण केले आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अद्रमुक) हा पक्ष 178 जागांवर उमेदवार देणार असून भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 27 जागा आल्या आहेत. पीएमके या पक्षाला 18, तर एएमएमके या पक्षाला 11 जागा दिल्या गेल्या आहेत.
या आघाडीत आणखी काही छोटे पक्ष समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत, अशी माहिती अद्रमुकच्या नेत्यांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण करण्यात येणार आहे. या वेळी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला वातावरण अनुकूल असून ही आघाडी पूर्ण बहुमत मिळविण्यास सक्षम आहे, असा विश्वासही या पक्षाकडून व्यक्त करण्यात आला.
पलानीस्वामी यांचे वक्तव्य
जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर अद्रमुकचे नेते एडापाडी ए. पलानीस्वामी यांनी पत्रकारांना माहिती दिली. आमची आघाडी ही विजयी आघाडी आहे. सध्या सत्ताधारी असणाऱ्या द्रमुक हा पक्ष आमच्या संदर्भात अफवा पसरवित आहे. आमच्या आघाडीच्या सदस्य पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच जागावाटप करताना कोणतीही अडचण आलेली नाही. राज्यातील जनता सत्ताधारी द्रमुकच्या भ्रष्टाचाराला आणि अरेरावीला कंटाळली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास व्यक्त करण्याच्या स्थितीत आता राज्यातले बहुसंख्य मतदार आहेत. त्यामुळे आम्हाला विजय मिळणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.