झारखंडमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित
भाजपला 68, ‘आजसू’ला 10 तर जेडीयूला 1 जागा, चिरागच्या पक्षालाही स्थान
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जाहीर करण्यात आले. भाजप आणि ‘आजसू’ने रांची येथील प्रदेश भाजप कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली. त्यानुसार 81 जागांपैकी भाजप 68 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, आघाडीतील अन्य पक्षांपैकी ‘आजसू’च्या वाट्याला 10, जेडीयूला 2 आणि ‘लोजप-आर’ला 1 जागा प्राप्त झाली आहे. भाजपने मित्रपक्षांसोबत निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय घेतला आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान आणि सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी रांची येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
झारखंड विधानसभेच्या एकूण 81 जागांसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपापसात जागा वाटून घेतल्या आहेत. जागावाटप निश्चित होताच भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. जागांच्या संख्येसोबतच काही मतदारसंघही निश्चित झाले आहेत. ‘आजसू’ला सिल्ली, रामगड, गोमिया, इचागड, मांडू, जुगसलाई, डुमरी, पाकूर, लोहरदगा आणि मनोहरपूर हे मतदारसंघ मिळाले आहेत. तर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूला जमशेदपूर पश्चिम आणि तामर जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या एलजेपीला (रामविलास) चतरा जागा मिळाली आहे.
झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान
झारखंड विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 28 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी 22 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
झारखंडमध्ये 44 जागा अनारक्षित
झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत. त्यापैकी 44 जागा अनारक्षित आहेत. 28 जागा एसटीसाठी तर 9 जागा एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झारखंडमध्ये सध्या सुमारे 2.6 कोटी मतदार आहेत. यामध्ये 1.29 कोटी महिला आणि 1.31 कोटी पुऊष मतदार आहेत. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे 11.84 लाख तऊण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.