राष्ट्रवादीची राष्ट्रवादीला ऑफर
साहेबांच्या खासदारांशी दादा गटाचा संपर्क, पक्षात येण्याचे आवतान, दोघांकडूनही इन्कार
प्रतिनिधी, मुंबई
राष्ट्रीय राजकारणातील आपले स्थान भक्कम करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडद्यामागे हालचाली सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अजितदादा गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याची चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले जात आहे. ‘राष्ट्रवादीने राष्ट्रवादीला ऑफर’ दिल्याचे वृत्त दिवसभर दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिल्याने एकच खळबळ उडाल्याचे दिसत होते.
अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील खासदार आपल्याकडे खेचून आणण्याची जबाबदारी खासदार सुनील तटकरे याच्यांकडे सोपवल्याची म्हटले जात आहे. त्यानुसार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवार गटाच्या 7 खासदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांचे खासदार अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे पुन्हा रीतसर पुनर्वसनही केले जाईल, असेही या खासदारांना सांगण्यात आले होते. मात्र शरद पवारांच्या खासदारांनी अजित पवारांची ऑफर नाकारली असल्याचे वृत्त आहे.
कुणाशीही संपर्क नाही : सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे खासदार फोडण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही केंद्रात एनडीएसोबत आहोत. महाराष्ट्रातही अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महायुतीत सरकारमध्ये आहोत. त्यामुळे आमची धोरणेही स्पष्ट आहेत. आम्ही सरकारसोबत आहोत, कुणालाही पक्षप्रवेशासाठी फोन करण्याची गरज नाही. असे सुनील तटकरेंनी म्हटले आहे.
आम्ही शरद पवार यांच्यासोबतच : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, अजित पवार गटाडून आमच्या आमदारांसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क झाला असे वाटत नाही आणि कितीही संपर्क झाला असला तरी आमचे आमदार किंवा खासदार कोणताही निर्णय घेणार नाहीत. कारण आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत. शरद पवार जे सांगतील तेच आम्ही करणार आहोत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
आम्ही अजितदादांकडे पाहातो
केंद्रात काठाचे बहुमत असलेल्या एनडीएला आपले निर्णय दामटवण्यासाठी बहुमत हवे आहे. त्यात नितीश कुमार कधीही साथ सोडतील अशी स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात मंत्री पद मिळण्याच्या लालसेने तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी ही खेळी केलेली आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुनील तटकरे स्वत:च्या ताकदीवर डील करीत आहेत की कोणाच्या सांगण्यावरुन हे डील करीत आहेत हे आपल्याला माहिती नाही. परंतू राष्ट्रवादीत आम्ही अजितदादांकडे पाहातो. जोपर्यंत त्यांच्या तोंडून याबाबत काही खुलास होत नाही तोपर्यंत आम्ही तटकरे यांना त्यांचा पाठिंबा आहे असे मानणार नाही असेही आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
आम्ही एकत्रच, बेबनाव नाही : खासदार बजरंग सोनावणे
आम्हाला कुणीही संपर्क केलेला नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. माध्यमांकडे कुठून ही बातमी आली ते माहित नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. मला स्वत:ला कोणाचाही फोन आला नाही अथा संपर्कही केलेला नाही. कुणी राजकीयदृष्ट्या सांगितलेही नाही, असेही ते म्हणाले. सभागृहात सुनील तटकरे भेटले होते. तथापि त्यावेळी कुठलाही राजकीय विषय झाला नाही. आम्ही शरद पवार यांच्या पक्षातले आठही खासदार एकत्रच राहू, आमच्यात कोणताही बेबनाव नाही, अशी ग्वाही खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली.
शरद पवारांनी सुनावले दादांच्या नेत्यांना
दादा गटाकडून खासदार फोडण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती मिळताच शरद पवार नाराज झालेले दिसत आहेत. त्यांनी दादांच्या नेत्यांना सुनावले असल्याचीही माहिती मिळत आहे. शरद पवार यांनी त्या नेत्यांना यापुढे असले प्रयत्नसुद्धा करु नका, असे बजावले आहे. शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षाला फटका बसू नये म्हणून हे वृत्त गांभिर्याने घेतले असल्याचे सांगितले जात आहे.