चिपळुणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार! शरद पवार २२ ला, अजित पवार उद्या चिपळुणात
चिपळूण / प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार २२ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावर शरद पवार शेतकरी, मजूर, कामगार यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २१ रोजी चिपळुणात सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा आहे.
एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पवार काका-पुतणे' यांनी कोकणातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. दोन्ही राष्ट्रवादीकडून कोकणात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी चिपळुण मतदारसंघाला पसंती देण्यात आली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे शेखर निकम आहेत. जे सध्या अजित पवार गटात कार्यरत आहेत. त्यामुळे दोन्ही पवारांच्या चिपळूण दौऱ्याकडे राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.