For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड

05:01 PM Jun 17, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड
Advertisement

स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी 'सरल' किंवा 'अपार' क्रमांक अनिवार्य

Advertisement

सोलापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सवलतधारी प्रवाशांसाठी डिजिटल पद्धतीने सेवा देण्यात येत आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासानंतर आता शालेय विद्यार्थ्यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

शाळा सोमवारपासून (दि. १५ जून) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी पाससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचे वितरण केले जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांना आधुनिक प्रवासाची सुविधा देण्यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. एनएसडीएल पेमेंट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे 'एनसीएमसी कार्ड' प्रकल्प राबवला जात आहे.

Advertisement

या प्रकल्पांतर्गत कार्ड नोंदणी वितरण प्रक्रिया एसटीच्या सर्व आगारांमध्ये सुरू आहे. शालेय शिक्षण (शैक्षणिक, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण ) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी 'सरल' किंवा 'अपार' क्रमांक असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचा हा सरल किंवा 'अपार' क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे मिळणार? शालेय विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी लागणारा अर्ज एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहिती व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया
प्रमाणित केलेला अर्ज बसस्थानकावरील किंवा आगारातील वाहतूक नियंत्रक/अधिकृत एजंट यांच्याकडे सादर करावा लागेल. तेथे कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांची 'एनसीएमसा' कार्ड नोंदणी केली जाईल.

तीस दिवसात मिळणार कार्ड

नोंदणी करताना विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा मोबाइल क्रमांक देणे सक्तीचे आहे. पाससाठी निश्चित शुल्काची रक्कम भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पावती दिली जाणार आहे. नोंदणी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत हे कार्ड प्रिंट होऊन संबंधित आगारात देण्यात येणार आहे. आगारात कार्ड आल्यानंतर तिथल्या 'पीओएस' मशीनद्वारे ते ॲक्टिव्हेट (चालू) करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.