‘एनसीएमसी’आधारित तिकीट प्रणाली होणार लागू
महिलांना शक्ती कार्ड दिले जाणार : टप्प्याटप्प्याने राज्यभर सुरू करणार : प्रभावी देखरेख ठेवणे शक्य
बेळगाव : महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘शक्ती’ योजना लागू होऊन जवळपास तीन वर्षे पूर्ण होत असताना राज्य सरकारने बससेवेत डिजिटल बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील चारही परिवहन महामंडळांमध्ये ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आधारित तिकीट प्रणाली लागू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना राज्यातील चारही परिवहन महामंडळांच्या बसमधून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे ‘शक्ती’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी स्वतंत्र ‘शक्ती कार्ड’ दिले जाणार असून या कार्डद्वारे त्यांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.
लाभार्थींना औपचारिक अर्ज करून ‘शक्ती कार्ड’ मिळवावे लागणार आहे. ई-केवायसी पडताळणीद्वारे त्यांची माहिती डिजिटल स्वरुपात नोंदविली जाणार असून सदर माहिती कार्डला जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मॅन्युअल तिकीट काढण्याची गरज राहणार नाही, तर स्वयंचलित प्रमाणीकरण शक्मय होणार आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या प्रवासाची नोंद रिअल-टाईममध्ये केली जाईल. यामुळे पारदर्शकता वाढून गैरवापराला आळा बसणार आहे. शिवाय डेटाची अचूकता सुनिश्चित होणार आहे.
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे मूल्यांकन सुरू केले आहे. सिस्टम इंटिग्रेटर निवडण्यासाठी व्यवहार सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. व्यवहार सल्लागार नियुक्त झाल्यानंतर सुमारे 10 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र प्रवाशांसाठी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यास आणखी सुमारे 6 महिने लागू शकतात. प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने काही परिवहन महामंडळांमध्ये ही प्रणाली सुरू केली जाणार असून त्यानंतर राज्यभर विस्तार केला जाणार आहे.
एनसीएमसी आधारित या नव्या प्रणालीत भविष्यात एकाच कार्डद्वारे विविध प्रकारच्या वाहतूक सेवांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सोप्या रिचार्जद्वारे प्रवासी बससह इतर सार्वजनिक वाहतुकीतही हे कार्ड वापरू शकणार आहेत. या उपक्रमामुळे मॅन्युअल पडताळणीवरील अवलंबित्व कमी होऊन कार्यक्षमता वाढणार आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे. ‘शक्ती’सारख्या अनुदानित योजनांवर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे शक्मय होणार आहे.