‘नायरा एनर्जी’कडून पेट्रोल-डिझेलची दरवाढ
नायरा’चे पेट्रोल 5, डिझेल 3 रुपयांनी महाग : सरकारी कंपन्यांकडून तूर्तास दरवाढ नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर शनिवारी सकाळपासून लागू झाले. या दरवाढीनंतर, भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 119.54 रुपये आणि डिझेलची किंमत 102.64 रुपये झाली आहे. ‘नायरा’ने दरवाढ जाहीर केली असली तरी तूर्तास सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांनी त्यांच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. जिओनेही कोणताही बदल केलेला नाही.
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ दर आणि वाढत्या खर्चातील तफावत कमी करण्यासाठी नायरा कंपनीने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर कंपनीने 26 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 आणि डिझेलच्या दरात 3 ने वाढ केली होती. मात्र, नंतर, पश्चिम आशियातील तणाव निवळल्यावर आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यावर कंपनीने 1 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात केली होती.