For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नक्षलींचा बीमोड

06:16 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
नक्षलींचा बीमोड
Advertisement

भारत नक्षलमुक्त झाल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला दावा महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा केली होती. हे उद्दिष्ट 100 टक्के साध्य झाले वा नाही, याबाबत मतमतांतरे असली, तरी या चळवळीचा कणा मोडल्यात जमा आहे, हे मान्यच करावे लागेल. सुरक्षा दलांचा दबाव आणि पुनर्वसनाच्या योजनांमुळे मागील दशकभरात दहा हजारांपेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. 2025 मध्ये तब्बल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याचे दिसून आले. तर 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये 630 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे पहायला मिळते. ही निश्चितच क्रांतिकारक घटना ठरते. प. बंगालमधील नक्षलबाडी येथून नक्षलवादी चळवळीचा उदय झाला, असे सांगण्यात येते. प्रारंभीच्या काळात नक्षली नेतृत्वाला वैचारिक बैठक होती. त्यात या नेतृत्वाने अभावग्रस्ताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची भूमिका घेतली. त्यातून ते समाजातल्या तळागाळातील लोकांशी जोडले गेले व दुर्गम भागातील जनतेचा त्यांना पाठिंबाही मिळत गेला. त्यातूनच छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार, आंध्र यांसारख्या राज्यांच्या दाट जंगल परिसरात ही चळवळ विस्तारत गेली. मात्र, नंतरच्या काळात नक्षली चळवळ भरकटली. हिंसा हेच तिचे प्रमुख कार्य बनले. त्यात नक्षलींनी खबरी असल्याच्या संशयातून गरीब आदिवासी व सामान्य लोकांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकेकाळी तिला असलेला जनाधार आक्रसत गेला. दुसऱ्या बाजूला नक्षलग्रस्त भागाकडे सरकारने वळवलेला मोर्चाही चळवळीच्या ओहोटीस कारणीभूत ठरला. विशेषत: भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यापासून नक्षलवादाविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली. अमित शाह यांनी या चळवळीचा बीमोड करण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली नाही. त्यामुळे याचे सर्वाधिक श्रेय त्यांना द्यावेच लागेल. नक्षली प्रामुख्याने रस्त्यांवर सुरूंग पेरून पोलिसांवर हल्ले करण्याची पारंपरिक पद्धत वापरत असत. त्यात आत्तापर्यंत हजारो पोलीस शहीद झाल्याची नोंद आहे. तथापि, मागच्या 10 वर्षांत नक्षली भागात पोलीस स्थानकांची संख्या 586 पर्यंत नेण्यात आली. नक्षलींच्या बालेकिल्ल्यांमध्ये पोलिसी बळ वाढवत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेड कॉरिडॉरमध्ये रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आल्याने नक्षलींना लपण्याकरिता पूर्वीसारखा वाव राहिला नव्हता. त्यात या अभियानाला गती देण्याकरिता अत्याधुनिक 68 हेलिपॅडही बनविण्यात आले. त्यामुळे नक्षली भाग पोलिसांच्या रडारवर आला. मुख्य म्हणजे मागच्या काही वर्षांत अनेक नक्षली नेते पोलीस कारवाईत मारले गेले. तर काहींनी शरणागती पत्करणे पसंत केले. मध्यंतरी नक्षली चळवळीतील महत्त्वाचा नेता असलेल्या भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह केलेले आत्मसमर्पण गाजले. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्नही निर्णायक ठरले. वास्तविक नक्षलवादी चळवळीचा उगम झाला, तो शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार, शिक्षणाचा अभाव, द्रारिद्र्या, शोषण यांसारख्या प्रश्नांमधून. तथापि, हिंसेवर आधारलेली कोणतीही चळवळ दीर्घकाळ टिकत नाही, हा आजवरचा जगाचा इतिहास आहे. नक्षली चळवळीबाबत तेच झाले. प्रारंभी आदिवासी व अभावग्रस्तांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नक्षलवादी चळवळीलाही भ्रष्ट विचार व आचाराने मगरमिठी घातली आणि त्यानेच या चळवळीचा घात झाला. सध्या ही चळवळ अखेरच्या घटका मोजत असेल, तर ती चांगलीच बाब आहे. परंतु, नक्षलींचे मूळ संपविण्यासाठी दारिद्र्या, बेरोजगारी यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.