For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांचा हल्ला

06:09 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांचा हल्ला
Advertisement

छत्तीसगडमधील मतदानापूर्वी आयईडी स्फोट : दोन सैनिकांसह दोन मतदान कर्मचारी जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमध्ये मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसाचार माजवत मतदान कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. नक्षलींनी घडवलेल्या आयईडी स्फोटात दोन सैनिकांसह दोन प्रशासकीय कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Advertisement

कांकेर जिल्ह्यातील छोटे बेटिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीएसएफ जवान आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एक संयुक्त निवडणूक पथक पॅम्प मारबेडा येथून रेंगा घाटी रेंगागोंडी मतदान केंद्राकडे जात असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आयईडीद्वारे स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात चंद्रप्रकाश सेवाल नामक बीएसएफ कर्मचाऱ्यासह मतदान पथकातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. याशिवाय आयईडी बॉम्ब निकामी करताना आयटीबीपीचा एक जवानही जखमी झाला आहे.

नारायणपूर जिह्यातील मुरहापदर गावात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात एकूण चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर छोटे बेटिया येथे उपचार सुरू आहेत. आता तेथील परिस्थिती सामान्य आहे. याशिवाय मतदान पथक आणि सैनिकांची तुकडी सुरक्षितपणे रेंगागोंडी मतदान केंद्रावर पोहोचल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अद्याप मतदानाला सुऊवात झाली नसतानाही नक्षलवाद्यांचा हिंसाचार सुरूच आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा हल्ल्यांमुळे सर्वसामान्य लोकांनी निवडणुकीत मतदान करण्यास टाळाटाळ केल्यास त्याचा टक्केवारीवर परिणाम होतो.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक असते. निवडणुकीच्या काही दिवस आधी बस्तर विभागातील विविध भागात नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी पत्रके टाकली होती. नक्षलवादी प्रत्येक वेळी निवडणुकीवर बहिष्कार टाकतात आणि या निर्णयात त्यांना साथ न देणाऱ्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास देतात. गेल्या आठवड्यात बस्तर विभागातून नक्षलवादी हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्यांपासून ते भाजप नेत्यांपर्यंत सहा जणांना ठार मारले आहे.

Advertisement
Tags :

.