40 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी सुधाकरचा खात्मा
छत्तीसगडमधील विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात चकमक : बसवराजू यांच्यानंतर आणखी एका टॉप कमांडरला कंठस्नान
वृत्तसंस्था/विजापूर
छत्तीसगडच्या विजापूर जिह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या केडरच्या उपस्थितीच्या माहितीवरून सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आल्यानंतर झालेल्या चकमकीत नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर उर्फ नरसिंह याला कंठस्नान घालण्यात आले. त्याच्यावर 40 लाखांचे बक्षीस होते.
नरसिंह किंवा सुधाकरला थेंटू लक्ष्मी, गौतम अशा नावांनीही ओळखले जात होते. तो केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि त्याच्या डोक्यावर लक्षावधी रुपयांचे बक्षीस होते. तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात सक्रिय असलेला नक्षलवादी हा अनेक हल्ल्यांचा आणि रणनीतींचा सूत्रधार असल्याचे मानले जात होते.
सुधाकर नामक नक्षलवादी कमांडर मागील 30 वर्षांपासून सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सुरक्षा दलांनी विजापूरच्या इंद्रावती व्याघ्र प्रकल्पात झालेल्या चकमकीत त्याला ठार मारले. गेल्या सहा महिन्यांत 3 केंद्रीय कमिटी सदस्य आणि नक्षलवादी प्रमुख बसवराजू याचा खात्मा केल्यानंतर आता सुधाकरलाही ठार करण्यात आले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
चकमकीत मारलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते असे सांगितले जात आहे. कारण चकमकीनंतर परिसरात सतत शोधकार्य सुरू आहे. चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि इतर वस्तूदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. याआधीही टॉप नक्षलवादी बसवराजूला सुरक्षा दलांनी पोलीस चकमकीत मारले होते. बसवराजूवर लाखोंचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. बसवराजूच्या मृत्यूने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर सुधाकरलाही कंठस्नान घातल्याने सुरक्षा दलाचे कौतुक होत आहे.