नक्षलवादी आंदोलनातील नेते वेल्लाथूवल स्टीफन यांचे निधन
वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील नक्षलवादी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले वेल्लाथूवल स्टीफन यांचे शनिवारी कोथमंगलमजवळील वडाट्टुपारा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. ते काही काळापासून वृद्धापकालीन आजारांवर उपचार घेत होते. राज्यातील नक्षलवादी चळवळीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या स्टीफन यांनी 1968 मध्ये झालेल्या थलासेरी पोलीस ठाण्यावरील हल्ल्यात सक्रिय भूमिका बजावली होती. यानंतर ते काही काळ भूमिगत झाले. भूमिगत असतानाही ते क्रांतिकारी चळवळीत सक्रिय राहिले. 1971 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी 15 वर्षे तुरुंगात काढली. अटक झाली तेव्हा त्यांच्यावर खुनाच्या आरोपांसह 18 खटले सुरू होते. तुरुंगातून सुटल्यानंतर ते धर्मप्रचाराकडे वळले. याचदरम्यान त्यांनी ‘चरित्रशास्त्रवुम मार्क्सियन दर्शनवुम’, ‘प्रचोदनम’ आणि ‘कनालवाझिकल कडन्नु ओरु दैवसाक्ष्यम’ यांसारखी अनेक पुस्तके लिहिली. तसेच प्रचंड वाचले गेलेले ‘वेल्लाथूवल स्टीफनटे आत्मकथा’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले.