नक्षलवादी म्होरक्याचा खात्मा
उडुपी जिल्ह्याच्या हेब्री येथील वनभागात एन्काऊंटर : आणखी पाच-सहा जणांचा शोध जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू पोलिसांच्या रडारवर असलेला मोस्ट वाँटेड नक्षलवादी म्होरक्या विक्रम गौडा याचा नक्षलविरोधी पथकाने (एएनएफ) खात्मा केला आहे. उडुपी जिल्ह्याच्या हेब्रीजवळील कब्बीनाले पीत्तबैल वनभागात सोमवारी रात्री विक्रम गौडा याचा एन्काऊंटर करण्यात आला. या वनभागात आणखी 5 ते 6 नक्षली असून त्यांचा शोध जारी आहे. त्यांना शरणागती पत्करण्याची संधी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मूळचा हेब्री तालुक्यातील असणारा नक्षलींचा म्होरक्या विक्रम गौडा याच्याविरोधात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यात 61 गुन्हे नोंद आहेत. मात्र, मागील 20 वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. काही दिवसांपूर्वी कोप्प तालुक्यातील कडेगुंडी गावातील सुब्बेगौडा नामक व्यक्तीच्या घरात 3 बंदूक आढळल्या होत्या. त्या घराला नक्षलवादी मुंगारु लता व तिच्या सहकाऱ्यांनी भेट दिली होती. याविषयी माहिती मिळाल्यानंतर 10 नोव्हेंबरपासून विक्रम गौडाचा शोध घेण्यासाठी नक्षलविरोधी पथकाने ‘कोंम्बिग ऑपरेशन’ हाती घेतले होते.
वस्तू खरेदीसाठी आले असता झटापट
सोमवारी रात्री कब्बीनाले पीत्तबैल वनभागातील एका गावात पाच जणांचा नक्षलवाद्यांचा गट दैनंदिन वस्तू खरेदीसाठी आला होता. त्यावेळी नक्षलवाद विरोधी गटाने त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रतिकार करत केलेल्या गोळीबारात विक्रम गतप्राण झाला. उर्वरित नक्षलींनी जंगलात पळ काढला. 2005 पासून नक्षलवाद्याचा हा चौथा एन्काऊंटर आहे.
जाहीर केले होते 5 लाखांचे बक्षीस
नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाने 10 वर्षांपूर्वी 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. विक्रम गौडा, मुंडगारु लता, जयण्णा, वनजाक्षी, सुंदरी यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना 5 लाख रु. बक्षीसदाखल देण्याची घोषणा केली होती. मागील 18 वर्षांपासून नक्षलींच्या गटात सक्रिय असणाऱ्या विक्रम गौडाविरुद्ध चिक्कमंगळूर जिल्ह्यात 12 गुन्हे तर केरळमध्ये 19 गुन्हे दाखल झाले होते.
नक्षली गटाच्या बैठका
केरळमध्ये देखील अलीकडे नक्षली कारवाया वाढल्या आहेत. मात्र तेथे नक्षलविरोधी पक्षकाने शोधमोहीम हाती घेतल्यानंतर त्यांनी दोन महिन्यापूर्वी कर्नाटक वनभागात पळ काढला. त्यांनी चिक्कमंगळुरातील काही ठिकाणी नक्षलवाद्यांच्या बैठका घेतल्या होत्या. कस्तुरीरंगन अहवाल, वनभागातील अतिक्रमण हटाव या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली होती. या भागात नक्षलींच्या कारवाया वाढल्याने नक्षलग्रस्त भागात हायअलर्ट घोषित करण्यात आला होता.
विक्रम गौडाची पार्श्वभूमी
विक्रम गौडा हा नक्षलवाद्यांच्या ‘नेत्रावती’ गटाचा नेता होता. कुद्रेमुख राष्ट्रीय वनोद्यान विरोधी आंदोलनात तो आघाडीवर होता. त्याच वेळी तो या भागातील नक्षलवाद्यांच्या गटात सामील होऊन सक्रिय झाला होता. तीन वेळा कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात तो यशस्वी ठरला होता. 2016 मध्ये केरळ पोलिसांनाही त्याने चकवा दिला होता. नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांना विक्रम गौडा याचा तीव्र विरोध होता. नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात प्रमुख भूमिका बजावलेल्या पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्याविरोधात विक्रमने चिक्कमंगळूर जिल्ह्यात पत्रके वाटप केली होती.