काँग्रेसच्या काळात फोफावला नक्षलवाद
पंतप्रधान मोदी यांच्या निर्धारामुळे त्यापासून मुक्ती
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या दुर्बल प्रशासनामुळे नक्षलवादी हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. संसदेत नक्षलवाद आणि त्याचा नाश या विषयावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी देश आता नक्षली हिंसेपासून मुक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धारामुळे केंद्र सरकारने हा नक्षलवाद संपवत आणला आहे, असे प्रतिपादन केले.
नक्षलवादाचा प्रारंभ अनेक दशकांपूर्वी झाला. त्याचे हिंसक स्वरुप त्याचवेळी स्पष्ट झाले होते. तथापि, केंद्रातील आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारांनी त्याचा वेळीच बिमोड केला नाही. त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले. छत्तीसगड राज्याच्या बस्तर या वनभागात काँग्रेसच्या प्रशासकीय दुर्बलतेमुळे मोकळे रान मिळाल्याने देशभर पसरला, असा आरोप त्यांनी केला.
इंदिरा गांधी यांना होता पाठिंबा
डाव्या विचारसरणीच्या अनेक जहाल गटांचा दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांनी पाठिंबा होता. 1970 मध्ये याच डाव्या गटांच्या साहाय्याने इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली होती. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी याच डाव्या विचारसरणीला स्वीकारले होते. या नक्षलवादाचा आर्थिक प्रगतीशी कोणताही संबंध नाही. वनवासी भागांची आर्थिक प्रगती केली जात नव्हती. त्यामुळे नक्षलवादाला बळ मिळाले, हे नक्षलवाद फोफावण्याचे मूळ कारण नाही. मूळ कारण हिंसाचारी तत्वज्ञान हेच आहे. त्यावेळच्या सरकारांच्या धोरणांचे पाठबळ मिळाल्यामुळे नक्षलवाद आणि माओवाद छत्तीसगड, झारखंड, ओडीशा आणि महाराष्ट्र या एकमेकांना लागून असणाऱ्या राज्यांमध्ये पसरला. त्यामुळे या नक्षली प्रभावाच्या क्षेत्राला ‘लाल पट्टा’ म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी माहितीही अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात दिली.
पोलिसांवरही हल्ले
काँग्रेसच्या सौम्य धोरणांमुळे नक्षलींचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलांवरही अनेक हल्ले केले आहेत. आतापर्यंत त्यांच्या हल्ल्यांमध्ये 20 हजारांहून अधिक निरपराध नागरीकांनी प्राण गमावले आहेत. पोलीसांवर हल्ले करणे, त्यांची शस्त्रे लुटणे, लोकांकडून खंडणी गोळा करणे हा नक्षलींचा कार्यक्रम होता. त्यावेळच्या सरकारांच्या दुर्बलतेमुळे वनभागातील लोक नक्षलींकडे ढकलले गेले. नक्षलवाद्यांनी गरीबांची कोणतीही प्रगती केली नाही. हिंसाचार हा जणू त्यांचा व्यवसाय होता, अशा अर्थाची अनेक विधाने शाह यांनी त्यांच्या भाषणात केली.
नक्षलवादापासून मुक्ती नजीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नक्षलवादाचा संपविण्याचा निर्धार केला आहे. केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षांमध्ये त्या दृष्टीने कसून प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश येत आहे. लवकरच हा देश नक्षलमुक्त होईल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असणाऱ्या सर्व राज्यांनीही आता नक्षलवाद आणि माओवाद यांचे खरे स्वरुप ओळखले आहे. त्यामुळे नक्षलवादाच्या निमूलनाला आता त्यांचेही सहकार्य मिळत आहे, असे प्रतिपादन शाह यांनी केले.