नवाब मलिक प्रकरणावर मनसेचा 'मिर्ची'चा तडका; हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोही... महायुतीला पटेल का ? अशी विचारणा
नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केल्यानंतर आता तेच सत्ताधारी बाकांवर बसल्यानंतर महायुती सरकारसह भाजपची कोंडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने यावर शिंदे गटासह भाजपवरही थेट आरोप करून सरकारला धारेवर धरले आहे. आता याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण आक्रमक झाली असून नवाब मलिकांचे उदाहरण देताना इक्बाल मिर्ची यांच्याशी प्रप्फुल्ल पटेल यांनी व्यवहार केल्याचा आरोप करणारे भाजपचे नेते आता गप्प का आहेत? असा थेट प्रश्न विचारला आहे.
मनसेने एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहून सरकारला खोचक प्रश्न विचारून या प्रकरणाला मिर्चीचा तडका दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये "हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या."असा उपहासात्मक टोला मनसेने हाणला आहे.
काय आहे प्रकरण ?
इडीच्या आरोपानंतर तुरुंगात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले आहेत. ते तुरुंगात असतानाच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे विभाजन होऊन अजित पवार हे आपल्या आमदारांसह शिंदे फडणवीस गटात सामिल झाले. त्यानंतर इडीच्या आरोपामुळे तुरुंगातून बाहेर आलेले अनिल देशमुख हे बाहेर येताच त्यांनी शरद पवारांचा हात धरला. त्यामुळे मुंबईतील राष्ट्रवादीचा नेता आणि मुस्लिम चेहरा असे ओऴखले जाणारे नवाब मलिक यांनी अजूनही आपली भुमिका जाहीर केली नव्हती.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते नागपूरला रवाना झाले. त्यांनी विधीमंडळ कामकाजात सहभागी होताना सत्ताधारी अजित पवार गटामध्ये जाऊन बसणे पसंत केले. त्यामुळे नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांबरोबर गेल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, याअगोदर प्रफुल्ल पटेल यांचे गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्याबरोबर अर्थिक हितसंबंध असल्याचा दावा या अगोदर भाजपने केला होता. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यामुळे पटेल यांचा इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा काँग्रेस व अन्य विरोधकांनी उपस्थित केल्याने फडणवीस व भाजपची कोंडी झाली आहे.