अरबी समुद्रात नौदलाची 48 तासांची धडक कारवाई
20 नाविकांची सागरी चाच्यांच्या तावडीतून सुटका : भारतीय वायुदलाचेही सहकार्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात 48 तास चाललेल्या समन्वित मोहिमेत सागरी चाच्यांच्या ताब्यात असलेल्या ‘अजिनी’ या मासेमारी नौकेवरील सर्व 20 नाविकांची सुरक्षित सुटका केली. ही कारवाई मुंबईपासून 3,000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल नौदलाचे अभिनंदन केले.
राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये सांगितले की, 2 नोव्हेंबर रोजी ही मोहीम पूर्ण झाली. भारतीय नौदलाने वेगाने नौकेचा माग काढून तिला रोखले आणि सशस्त्र सागरी चाच्यांच्या ताब्यातून नाविकांसह नौका सुरक्षित बाहेर काढली. भारतीय वायुदलाच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या सुऊवातीला सोमालियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ सशस्त्र सागरी चाच्यांच्या गटाने ‘अजिनी’ जहाजाचे अपहरण केले होते. चाच्यांकडून या जहाजाचा ‘मदर शिप’ म्हणून वापर करून परिसरातील व्यापारी जहाजांवर आणखी हल्ले होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
समुद्री सुरक्षेसाठी सज्जतेचा संदेश
या मोहिमेतून भारतीय नौदलाची उच्च परिचालन सज्जता आणि समुद्रातील धोक्मयांना निर्णायकपणे तोंड देण्याची क्षमता पुन्हा अधोरेखित झाल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले. नागरिकांचे प्राण वाचवणे, समुद्री सुरक्षा राखणे आणि हिंद महासागर क्षेत्रात स्थैर्य टिकवणे यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमालियातील 12 पेक्षा अधिक सागरी चाच्यांनी अरबी समुद्रात ‘अजिनी’ या मासेमारी नौकेचे अपहरण केले होते. नौकेवर 20 भारतीय नाविक होते. घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने कारवाई सुरू केली. सुमारे 48 तासांच्या मोहिमेनंतर सर्व नाविकांची सुटका करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली.
नौदल आणि वायुदलाची संयुक्त कारवाई
धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने मोहिमेवर तैनात युद्धनौका कारवाईसाठी पाठवली. समुद्री टेहळणी विमानाचीही मदत घेण्यात आली. या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने सतत देखरेख ठेवून जहाजाचा ठावठिकाणा शोधला आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. जहाज पळून जाऊ नये यासाठी घातक नसलेल्या उपायांचाही वापर करण्यात आला.
सी-17 मधून कमांडोंची उतराई
या मोहिमेत भारतीय वायुदलाच्या सी-17 विमानातून मरीन कमांडोंना अचूक एअरड्रॉपद्वारे घटनास्थळी उतरवण्यात आले. त्यानंतर नौदलाने वेगाने सामरिक कारवाई करत जहाजाचा ताबा घेतला आणि चाच्यांचा धोका निष्प्रभ केला. सर्व 20 नाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. समुद्री प्रवाशांची सुरक्षा, महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गांचे संरक्षण आणि हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित व स्थिर समुद्री वातावरण राखण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
सागरी बळ पुन्हा सिद्ध
- अरबी समुद्रात 48 तासांच्या मोहिमेत 20 नाविकांची सुरक्षित सुटका.
- नौका ‘अजिनी’ मुंबईपासून 3,000 किमीपेक्षा अधिक अंतरावर होती.
- भारतीय नौदलाच्या कारवाईला वायुदलाचे सहकार्य.
- नौकेचे अपहरण सोमालियातील समुद्री चाच्यांनी केले होते.
- मोहिमेदरम्यान अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे वृत्त.
