For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नौदलाला मिळणार 8 अत्याधुनिक युद्धनौका

06:45 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
नौदलाला मिळणार  8 अत्याधुनिक युद्धनौका
Advertisement

53,866 कोटींच्या करारांवर स्वाक्षरी : सागरी सामर्थ्य वाढवण्याचे भारताचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 8 नवीन अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याकरिता 53,866.50 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या अत्याधुनिक कॉर्व्हेट्स असून त्या आधुनिक क्षेपणास्त्र, शस्त्रs आणि सेन्सर प्रणालींनी सुसज्ज असतील. या युद्धनौका बांधण्यासाठी दोन भारतीय कंपन्यांना काम सोपवण्यात आले आहे. त्यानुसार कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडला पाच, तर गोवा शिपयार्ड लिमिटेडला तीन युद्धनौका बांधण्याची संधी मिळालेली आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत सोमवारी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

Advertisement

भारतीय नौदलाला मिळणाऱ्या नवीन कॉर्व्हेट्स आधुनिक क्षेपणास्त्र, शस्त्रs आणि सेन्सर प्रणालींनी सुसज्ज असल्यामुळे नौदलाला हवाई, सागरी आणि पाण्याखालील धोक्यांचा सामना करणे शक्य होईल. या जहाजांचा उपयोग सागरी व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी, शत्रूची जहाजे आणि पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी आणि किनारी सुरक्षा राखण्यासाठी केला जाईल. तसेच, किनारपट्टीवरील लष्करी कारवाया आयोजित करण्यास आणि त्यांचे निरीक्षण करण्यासही ते मदत करतील.

भारतीय बनावटीच्या साहित्य-तंत्रज्ञानाचा वापर

संरक्षण मंत्रालयाच्या मते, या युद्धनौकांचे 70 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भारतातच तयार केले जातील. त्यांची रचना (डिझाइन) देखील भारतीय नौदलाद्वारे विकसित केली जाईल. 2030 पर्यंत या युद्धनौका नौदलाला सुपूर्द करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमांचा एक भाग असल्यामुळे देशात युद्धनौका बांधणीला प्रोत्साहन मिळेल. तसेच इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल आणि संरक्षण क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा सहभाग वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी

संरक्षण मंत्रालयाच्या मते, या युद्धनौकांच्या बांधणीमुळे पुढील 10 वर्षांत जहाजबांधणी कारखान्यांमध्ये 72 लाख कामाचे दिवस आणि संबंधित उद्योगांमध्ये 460 लाख कामाचे दिवस रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच विविध प्रकारच्या रोजगारासह एकूण 532 लाख कामाचे दिवस इतका प्रचंड रोजगार निर्माण होईल. या प्रकल्पामध्ये सरकारी संरक्षण कंपन्यांसोबतच खासगी जहाजबांधणी कंपन्या आणि भारतीय उद्योगांचा समावेश असेल. तसेच लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अत्याधुनिक युद्धनौकांची खासियत....

वजन : सुमारे 2,000 टन

निर्मितीचे काम : कोलकाता आणि गोवा शिपयार्ड कंपनी करणार

उपयोग : किनारी सुरक्षा, सागरी गस्त, शोध-बचावकार्यात मदत

रचना : आधुनिक शस्त्रs आणि सेन्सर्सचा सुयोग्य पद्धतीने वापर

वेग : 30 नॉट्स म्हणजेच ताशी 55.5 किलोमीटर वेगाने धावणार

कामगिरी : शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यास, पाणबुड्यांचा शोध घेण्यास आणि हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यास सक्षम.

Advertisement
Tags :

.