वेंगा फिटनेस फायटर्सचे नवरात्री 'नाईन X नाईन' रन मिशन
नवरात्रीचे नऊ दिवस नऊ किलोमीटर रन / वॉकचे चॅलेंज पूर्ण अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : शनिवार १२ रोजी होणार सहभागींचा सन्मान
महेंद्र मातोंडकर/वेंगुर्ले
धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अगदी कमी वयात आपल्याला विविध व्याधींचा सामना करावा लागत आहे. कष्टाच्या कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतल्याने शारीरिक कसरतीही कमी झाल्या आहेत. परिणामी, माणसांमध्ये आळसाचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे माणसातील उत्साह कुठेतरी लोप पावत आहे. माणसाचे शरीर आता अनेक आजारांचे आगार होऊ लागले आहे. याबाबत जगजागृती करून माणसांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेंगुर्त्यात वेंगा फिटनेस फायटर्समार्फत या नवरात्री उत्सवात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. याला जिल्ह्यासह विदेशातील नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या अनेक वर्षापासून वेंगुर्त्यात वेंगा फिटनेस फायटर्स ही संस्था नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे काम करत आहे.
आळसावर मात करून नवीन उत्साह कमावता यावा यासाठी या वेंगा फायटर्सतर्फे मॉर्निंग रन, वॉकिंग क्लब, सायकलिंक क्लबचीही निर्मिती करण्यात आली. या क्लबचे सदस्य हेल्दी आरोग्यासाठी दररोज सायकलिंग किंवा रनिंग, वॉकिंगच्या माध्यमातून स्वतःला अॅक्टिव्ह करत आहेत. काही वर्षापूर्वी सुरू झालेल्या या क्लबच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. सुमारे १०० हून असंख्य सदस्य वेंगा फिटनेसला जॉईन झाले आहेत. हे सर्व सदस्य दररोज चालणे व धावणे या उपक्रमात सहभागी असतात. अनेकजन सायकल चालविण्याच्या अॅक्टिव्हिटीत सहभागी असतात. या सदस्यांना आरोग्याच्याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे, व्यायामाची आवड लावणे, मॉर्निंग वॉकचे महत्व पटवून देणे, मार्निंन रण, वाँक व सायकलिंग उपक्रमामध्ये सहभाग वाढविणे आदी काम वेंगा फायटर्सतर्फे सुरू आहे. पावसाळ्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे दररोज मार्निंग वॉक करणाऱ्यांच्या दिनक्रमातही खंड पडतो. अनेकजण खुप पाऊस आहे म्हणून वॉकला बाहेर पडण्याचे टाळतात. हळूहळू हे प्रमाण वाढत जाते व पुन्हा एकदा आळस आपल्यावर भारी होत जातो. मार्निंगवॉकची आपली सवयही हळूहळू सुटत जाते. त्यामुळे पडलेली ही गॅप पुन्हा भरून काढणे कठीण बनते. यावर मार्ग म्हणून वेंगा फायटर्सने कुडाळच्या रांगणा रनर्स ग्रुपचे सहाय्य घेऊन गतवर्षी नवरात्री रनिंग मिशन उपक्रमाची सुरूवात केली होती. यावर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला. घटस्थापनेपासून गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी उपक्रमाला सुरूवात झाली. नवरात्री उत्सवातील नऊ दिवस रोज नऊ किलोमीटर वॉक किंवा रनिंग करायचे चॅलेंज या उपक्रमांतर्गत देण्यात आले होते. शुक्रवारी ११ रोजी या उपक्रमाची सांगता झाली. यावर्षी असंख्य नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. वेंगुर्ले कॅम्प येथे भल्या सकाळी नऊही दिवस धावणे व चालणाऱ्यांची गर्दी दिसून येत होती, असे या उपक्रमाविषयी दै. तरुण भारत संवादशी बोलताना वेंगा फिटनेस फायटर्सचे डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी सांगितले.
*विविध भागासह विदेशातील नागरिकांचाही सहभाग*
व्हर्चुअल पद्धतीने या उपक्रमात सहभागी होण्याचीही संधी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आहे त्या ठिकाणाहून उपक्रमात सहभाग घेतला. विदेशातील काही नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन त्याचे अपडेट वेंगा फायटर्सकडे पाठविले आहेत. या उपक्रमांतर्गत ९ किलोमीटर ९ दिवस रन/वॉक करण्याचे चॅलेंज देण्यात आले होते. जिल्ह्यातील नामवंत डॉटर्सचा या उपक्रमाला पाठिंबा मिळाला आहे. डॉ. प्रशांत मडव, डॉ. आंबेरकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. रावराणे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, मोहन होडावडेकर, गोविंद परुळेकर, आदित्य प्रभू-खानोलकर, डॉ. अमेय प्रभू-खानोलकर, शिवदत्त सावंत, डॉ. अश्विनी सामंत-माईणकर, कविता भाटिया, संजय भाटकर, संजय परब, विश्राम घाडी आदींसह अनेक सदस्यांच्या प्रोत्साहनामुळे ही सिग्नेचर ऍक्टिव्हिटी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील रांगणा रनर्स कुडाळ, ब्युटी ऑन व्हिल्स कट्टा, राधारंग फाउंडेशन परुळे या फिटनेस ग्रुपनेही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.
*नवरात्री मिशनमधील रनर्सचा शनिवार १२ रोजी सन्मान*
गेले नऊ दिवस सुरू असलेल्या या मिशनमध्ये प्रत्यक्ष व व्हर्चुअल पद्धतीने सुमारे २०० हून अधिकजणांनी सहभाग घेतला आहे. यात वेंगुर्लेसह कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, तळेरे, परुळे, कट्टा, मालवण आदी भागातसह विदेशातील पाच सदस्यांनी सहभाग घेतला आहे. याचे संपूर्ण अपडेस वेंगा फिटनेस फायटर्सकडे आहेत. या सहभागी सदस्यांपैकी १० सेलिब्रेटी रनर्स आणि चॅलेंज पूर्ण करणाऱ्या १०० सहभागी सदस्यांचा मेडल, प्रमाणपत्र व टीशर्ट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्राच्या आवारात सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ६ वाजता जिल्ह्यातील सेलिब्रेटी रनर्स वेंगुर्ले कॅम्प येथे प्रत्यक्ष रन / वॉक अॅक्टिव्हिटीत सहभागी होणार आहेत. सन्मान सोहळ्यावेळी सेलिब्रेटी रनर्स व जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य व आहार विषयक मार्गदर्शनही करणार आहेत. या सोहळ्याला वेंगुर्लेवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगा फिटनेस फायटर्सतर्फे करण्यात आले आहे.