रत्नदुर्गवरील श्री देवी भगवती मंदिरात नवरात्रोत्सव तयारी
रत्नागिरी :
रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिरात यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा होणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे देवीला रूपे परिधान करण्यात येतील. दुपारी १२ वाजता देवीची घटस्थापना होऊन आरती केली जाणार आहे. त्यानंतर २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान दररोज भजन, कीर्तन व पाठ वाचन होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. ढोलवादन स्पर्धा रंगणार असून भक्तांचा उत्साह उंचावणार आहे. उत्सवानिमित्ताने ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. कुमारीका पूजन व घट उचलण्याचा सोहळा पार पडेल. रात्री १२ वा. पारंपरिक गोंधळ (आराबा) होणार आहे. शेवटच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. सोने लुटणे कार्यक्रम होऊन नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. श्री देवी भगवती मंदिरात होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.