Navratri 2025 Navdurga Kolhapur: नवदुर्गेच्या परिक्रमेतील तृतीय दुर्गा 'पद्मावती'
नृसिंहाच्या अवतारात दर्शन दिले म्हणून तिला नृसिंहरुपिनी असेही म्हटले जाते
By : दिव्या कांबळे
कोल्हापूर : करवीर महात्म्यामध्ये 29 व्या अध्यायामध्ये पद्मावती देवीची गोष्ट लिहिलेली आहे. पापातून मुक्त होण्यासाठी पद्माळा तळ्याकाठी केलेल्या तपश्चर्येमुळे नरसिंह अवतारातील देवीचे दर्शन घेऊन भक्त प्रल्हाद मुक्त झाले, अशी पौराणिक आख्यायिका आहे. कोल्हापुरातील पद्मावती देवीचे मुख्य पुजारी राधिका कालेकर यांनी नवदुर्गा विशेष पर्वात पद्मावती देवीचे महात्म्य सांगितले.
पद्म म्हणजे कमळ, पद्माचे आलय म्हणजे कमळाचे मंदिर. तेथे देवी प्रकट झाली म्हणून या देवीस पद्मावती नाव पडले. तिने नृसिंहाच्या अवतारात दर्शन दिले म्हणून तिला नृसिंहरुपिनी असेही म्हटले जाते. भक्त प्रल्हादांच्या काळातील त्याबाबत उद्बोधक गोष्ट आहे, असे पुजारी राधिका कालेकर यांनी सांगितले.
मंदिराच्या आवारात असणारे महादेव मंदिर हे भक्त प्रल्हाद यांनी स्थापन केलेले आहे. ते प्रल्हादेश्वर या नावाने ओळखले जाते. पौराणिक कथा असलेल्या या देवीची नेमकी आख्यायिका आणि स्थानिक लोकांची श्रद्धा काय आहे? असा प्रश्न मनामध्ये येतो. त्याचे उत्तर देताना राधिका कालेकर सांगतात, की स्थानिक लोकांमध्ये पद्मावती देवीबद्दल अपार श्रद्धा आहे.
या मंदिरामध्ये महाराष्ट्रातून जैनधर्मीय लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. ही पद्मावती देवी कित्येक लोकांची कुलदेवता आहे. पद्मावती मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद यांनी स्थापन केलेले प्रल्हादेश्वर म्हणजेच महादेव, त्याचबरोबर भगवान विष्णू, नाईकबा, नागदेवता, हनुमान, सटवाई, गजलक्ष्मी, गणपती अशा सर्व देवता आहेत. पद्मावती मंदिर उत्तराभिमुख आहे. देवीची मूर्ती दोन ते अडीच फुटांची आहे.
बैठ्या स्वरूपातील या मूर्तीचा एक पाय दुसऱ्या गुडघ्या वरती ठेवलेला आहे. पायामध्ये तोडे, वाळे, पैंजण रेखलेले आहे. दोन्ही हातामध्ये तलवार आणि ढाल आहे. नवदुर्गेच्या परिक्रमेतील तृतीय दुर्गा ही पद्मावती देवी आहे. शारदीय नवरात्र उत्सवात नऊ दिवस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तजन देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवात देवीचे मंदिर पहाटे पाच वाजता उघडले जाते. देवीची पूजा केली जाते. साडी नेसवली जाते. अलंकार चढवले जातात, कुंकू रेखले जाते. साज शृंगार करून देवीला सजवले जातं. नवरात्रीच्या काळात देवीला रेशमी वस्त्रात सजवले जाते. दागिन्यांमध्ये कोल्हापुरी पारंपरिक दागिने घातले जातात.
डोईवरती किरीट असतो. त्यावर गजरा माळलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचा, चाफ्याच्या हार घातला जातो. नवरात्र उत्सव काळात भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातील पालखी षष्ठीला या मंदिरात दर्शन घ्यायला येते.
देवीला पानसुपारीचा विडा अर्पण केला जातो. ही खूप जुनी परंपरा आहे. सकाळी पंचामृत, फळे, तसेच उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. आटीव दुधापासून बनवलेला पदार्थ म्हणजे पायस याचा नैवेद्य खास नवरात्री उत्सवात देवीला अर्पण केला जातो, असे राधिका कालेकर यांनी सांगितले.