Navratri 2025 Kolhapur Navdurga: नवदुर्गा परिक्रमेतील चौथी नवदुर्गा, फिरंगाई देवी!, काय आहे देवीची अख्यायिका
60 वर्षांपासून गजानन गुरव मंदिराची आणि देवीची अखंडित सेवा करतात
By : गौतमी शिकलगार
कोल्हापूर : करवीर नवदुर्गेतील चौथी नवदुर्गा म्हणून फिरंगाई देवीकडे पाहिले जाते. याच फिरंगाई देवीच्या माहात्म्याबाबत बोलताना, गजानन गुरव म्हणाले, फिरंगाई देवीचे मूळ स्थान बलुचिस्तानमधील आहे. बलुचिस्तानात या देवीला प्रिंगाई असे संबोधले जात होते. मागील साठ वर्षांपासून गजानन गुरव या मंदिराची आणि देवीची अखंडित सेवा करत आहेत.
ते म्हणतात, फिरंगाई मंदिराचे स्थापत्य शास्त्र पांडव काळात तयार करण्यात आले आहे. या देवीच्या चेहऱ्यावर सिंहाचे रूप दिसून येते तशीच देवी सिंहारूढ आहे. मंगळसूत्र, बांगड्या, साडी, कवड्याची माळ असा साजशृंगार देवीला केला जातो. याशिवाय मंदिरातील पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील व्याधी कमी होतात आणि त्वचेचे आजार कमी होतात, असे मानले जाते.
तसेच त्वचारोगाचा त्रास कमी होत नसल्यास देवीला नऊ मंगळवार पीठमिठाचा जोगवा अर्पण करण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दरम्यान, नऊ दिवस घट बसवून देवीची सालंकृत पूजा-अर्चा केली जाते. या दिवसांत मंदिराच्या मंडपामध्ये भजनाचे कार्यक्रम घेतले जातात. नवरात्रीच्या काळात मंदिरात नेहमी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
फिरंगाई देवी कोल्हापुरात येण्यापूर्वी तिची एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, देवीचा एक भक्त होता तो कोल्हापुरातून तुळजापुरात चालत जायचा. वयोमानानुसार तो मनुष्य थकत गेल्यानंतर त्याने तुळजाभवानीला प्रश्न केला की, तू माझ्या घरी येशील का? या प्रवासामध्ये देवीकडून त्याला एक अट घालण्यात आली होती. त्या भक्ताने मागे वळून पहायचे नाही.
विश्रामासाठी त्याने सध्याच्या फिरंगाई मंदिरात आसरा घेतला, तर त्याचवेळी त्या भक्ताने पाठीमागे वळून बघितले आणि फिरंगाई देवी गुप्त झाली. तांदळाच्या रुपात फिरंगाई देवी प्रकट झाली. अशी आख्यायिका मंदिराचे पुजारी गजानन गुरव यांनी सांगितले.
देवीला श्रावण महिन्यात पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढीमध्ये वडी भाकरी, आंबील असे नवरसांचे नेवैद्य सणासुदीला दाखवले जातात. संपूर्ण आशिया खंडामध्ये फक्त कोल्हापुरातच नवदुर्गेचे दर्शन करायला मिळते. त्यामुळे कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरातूनही देवीच्या दर्शनासाठी लोक गर्दी करतात.