Navratri 2025 Jotiba Dongar: जोतिबाच्या नावान चांगभलंचा गजर, दर्शनासाठी भाविकांची अखंड गर्दी
कर्नाटक व अन्य राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले
कोल्हापूर : जोतिबाच्या नावान चांगभलचा अखंड गजर व गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण, असंख्य भाविक भक्तांचा अपूर्व उत्साह अशा भक्तिमय व चांगभलंमय वातावरणात बुधवारी शारदीय नवरात्र उत्सवातील तिसरा दिवस संपन्न झाला. महाराष्ट्रसह कर्नाटक व अन्य राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले.
यावेळी श्रीस महाभिषेक, महापोशाख धार्मिक विधी, धुपारती सोहळा, उत्साहात करण्यात आला. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री यमाई देवीची सुवर्णअलंकारित आकर्षक खडी महापूजा बांधण्यात आली होती. दरम्यान, श्रीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी झाली होती.
दर्शन मंडपातून श्रीच्या दर्शनाची लाईन सुरु होती. श्रीस तेल नारळ दवना गुलाल हार फुले फळे वाहून पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी मंदिरात झाली होती. दरम्यान, बुधवारी पहाटे 3 वाजता घंटानाद करून श्रीं चे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर श्री सह सर्व देव- देवतांची पाद्यपूजा - काकडआरती , महाभिषेक, महापोशाख घालून पूजा बांधण्यात आली.
त्यानंतर धार्मिक विधी करून महानैवेद्य दाखवण्यात आला. दरम्यान सकाळी दहा वाजता उंट, घोडा, वाजंत्री, श्रीचे पुजारी, देवसेवक, हुद्देवाले, ढोली, डवरी, म्हालदार, चोपदार, देवस्थान समितीचे अधिकारी धैर्यशील तिवले, कर्मचारी सिंधिया देवस्थान ट्रस्टचे अधिकारी अजित झुगर व कर्मचारी शाही पोशाखात, तसेच पोलीस पाटील बाळासाहेब पाटील व भाविक भक्त, नवरात्रकरी, पुजारी, ग्रामस्थ, असा लवाजमा यमाई मंदिराकडे गेला.
तेथे धार्मिक विधी करून हा लवाजमा परत जोतिबा मंदिरात आला. त्यानंतर तोफेची सलामी देऊन हा सोहळा श्रीं च्या मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर त्रिकाळ आरती करून अंगारा वाटप करण्यात आला. रात्री भजन, भावगीताचा कार्यक्रम करण्यात आला. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थानचे धैर्यशील तिवले व कर्मचारी, पुजारी समितीचे पुजारी वर्ग व सिक्युरिटी गार्ड तसेच दहा गावकर प्रतिनिधी व कोडोली पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तैनात होते.
कमळ पुष्प पाच पाकळ्यातील सुवर्णालंकारित पूजा नवरात्र उत्सवातील तिसऱ्या दिवशी बुधवारी श्री जोतिबा देवाची कमळ पुष्प पाच पाकळ्यातील सुवर्णालंकारित आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीचे पुजारी विशाल ठाकरे, अधिक ठाकरे, अंकुश दादर्णे, सोमनाथ ठाकरे, गणेश दादर्णे, प्रवीण कापरे, अजित भंडारे, उमेश शिंगे, सुरज ठाकरे, विनोद मिटके, लखन ठाकरे, हरिदास सातार्डेकर, अविनाश कापरे, दिपक भिवदर्णे यांनी बांधली होती.
काळभैरव यमाई चोपडाई महादेव नंदी या देवांची महापूजा केदार चिखलकर, आदीनाथ लादे, शरद सांगळे केदार शिंगे स्वप्निल दादर्णे, तुषार झुगर, संग्राम सांगळे, कैलास ठाकरे सतीश मिटके, अजित बुणे सौरभ सांगळे, सचिन ठाकरे जयदिप आमाणे, अशोक मिटके, सुमित भिवदर्णे, रोहन सांगळे, प्रविण झुगर यांनी बांधली.