Navratri 2025 Jotiba Dongar: दख्खनचा राजा जोतिबाच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ, आकर्षक महापूजा
पहिल्या दिवशी श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली
जोतिबा डोंगर : महाराष्ट्र, कर्नाटकचे कुलदैवत असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी, जोतिबा डोंगर येथे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जोतिबा देवाबरोबरच चोपडाईदेवी व यमाई देवींचा नवरात्रोत्सव, धार्मिक विधी, सोहळे मंगलमय व विशिष्ट पद्धतीने भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात. शारदीय नवरात्रोत्सवा निमित्य लाखो भाविक श्रींचे व यमाई, चोपडाई, काळभैरव देवांच्या दर्शनासाठी येत असतात.
शारदीय नवरात्र उत्सवातील घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पहिल्या दिवशी सोमवार निमित्ताने श्री जोतिबाची नागवल्ली पानातील सुवर्णालंकारित राजेशाही बैठी आकर्षक महापुजा बांधली होती. ही पुजा श्रींचे पुजारी विशाल ठाकरे, अंकुश दादर्णे, प्रवीण कापरे, अजित भंडारे, महादेव झुगर, विनोद मिटके, हरिदास सातार्डेकर, अविनाश कापरे, दिपक भिवदर्णे, श्रीचरण कापरे यांनी बांधली.
काळभैरव, यमाई, चोपडाई, महादेवांची महापूजा केदार चिखलकर, केदार शिंगे, तुषार झुगर, स्वप्निल दादर्णे, संग्रम सांगळे, सतीश मिटके, अजित बुणे, गणेश सांगळे, सचिन ठाकरे, अशोक मिटके, सुमित भिवदर्णे, रघुनाथ ढोली, रोहन सांगळे कैलास ठाकरे यांनी बांधली जोतिबा मंदिरात आजपासून नऊ दिवस विविध सोहळे धार्मिक विधी, भजन, कीर्तन रुढी परंपरेनुसार होणार आहेत.
दरम्यान सोमवारी पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करुन मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. यावेळी श्रींचे पाद्यपूजा व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर 5 वाजता जोतिबा देवाबरोबर, नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, तुकाई, दत्त व रामलिंग देवांना महाभिषेक घालण्यात आले. त्यानंतर सर्व देवांची वैशिष्ट्यापूर्ण व अलंकारिक महापुजा बांधण्यात आली.
यावेळी धार्मिक विधी करून केदारकवच, केदारस्तोत्र, केदारमहिमा सुक्तांचे पठण केरबा उपाध्ये, प्रकाश उपाध्ये, सुरज उपाध्ये, बंडा उमरानी, अक्षय बुरांडे, गणेश उपाध्ये, हरिदास उपाध्ये, सुमित उपाध्ये यांनी केले. त्यानंतर धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात आला.
सोमवारी सकाळी दहा वाजता उंट, घोडा, वाजंत्री, म्हालदार, चोपदार, श्रींचे पुजारी, डवरी, ढोली, देवस्थान समितीचे इन्चार्ज ऑफिसर धैर्यशील तिवले व कर्मचारी व देवसेवक स्टॉप सिंधिया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे अधिकारी अजित झुगर व कर्मचारी शाही पोशाखात, दहा गावकर प्रतिनिधी तसेच भक्तगण या लव्याजम्यासह यमाई मंदिराकडे धुपारती सोहळ्याचे प्रस्थान झाले.
यावेळी यमाई मंदिरामध्ये धार्मिक विधीसह घट बसवून हा सोहळा तुकाई मंदिरात आला तेथे तोफेच्या सलामीसह घट बसवण्यात आले. त्यानंतर कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला. दुपारी 1 वाजता धुपारती सोहळा जोतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप केला.
नवरात्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवासाठी व भाविकांच्या सेवेसाठी जोतिबा देवस्थान तसेच दहा गावकरी प्रतिनिधी, पुजारी समिती परिश्रम घेत आहेत. एसटी महामंडळातर्फे जादा बस सोडल्या आहेत.
जोतिबा देवाचा नवरात्र उपवास कसा करावा
घटस्थापना ते खंडेनवमीपर्यंत उपवास असतो. पहिल्या दिवशी व जागरादिवशी एक वेळ फलाहार केला जातो. इतर दिवशी दोन वेळ फलाहार केला जातो. पुरुष मंडळी धोतर उपरणे असा पेहराव करतात. जोतिबा देवाचे नामस्मरण जप करत पुरुष, महिला अनवाणी राहतात.