Navratri 2025 Ambabai Temple: वेध नवरात्रीचे, मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरु
नवरात्रकाळात दररोज अंबाबाईची विविध रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येते
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारीला वेग आला आहे. मंगळवारपासून मंदिराच्या शिखरांच्या रंगरंगोटीला सुरुवात झाली. गुरुवारपासून मंदिराची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात येणार आहे.
साडेतीन शक्तिपीठ देवता असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात सुमारे 25 लाख पर्यटक व स्थानिक भाविक दर्शनासाठी येतात. यादृष्टिने बॅग काऊंटर, चप्पल स्टैंड, माहिती कक्ष, लाडू प्रसाद केंद्र याचे नियोजन करण्यात येत आहे. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारी असलेल्या दर्शनररांगेच्या बॅरिकेट्समध्ये वाढ झाली आहे. नवरात्रकाळात पाऊस आल्यास उपाययोजनेसाठी दर्शनरांग व पुलावर छत उभारण्यात येणार आहे.
मंदिराची मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीकडून गुरुवारपासून स्वच्छता केली जाणार आहे. त्याचबरोबर परिसरातील अन्य मंदिरांचीही स्वच्छता या आठवड्यात केली जाणार आहे. नवरात्रकाळात दररोज अंबाबाईची विविध रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. देवीच्या विविध धार्मिक विधीनुसार अलंकार परिधान केले जातात. देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची पुढील आठवड्यात स्वच्छता करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षीपासून मंदिर आवारात गरुड मंडप व नगारखाना या इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तातडीने गरुड मंडपाचे छत उतरवण्याचे काम करण्यात आले. मात्र नवरात्रात दररोज देवीची पालखी प्रदक्षिणा व अष्टमीदिवशी नगर प्रदक्षिणा सोहळा करण्यात येतो. यासाठी देवीच्या उत्सवमूर्तीची पालखी गरुड मंडपात विराजमान असते. मात्र आता गरुड मंडपाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
ते नवरात्रीपर्यंत होईल असे वाटत नाही. त्यामुळे सध्या खांब उभारुण झाले की, त्यावर कामासाठी उभारलेल्या शेडच्या मदतीने या खांबाचा नवरात्रोत्सवासाठी तात्पुरता वापर केला जाणार आहे. नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीकडून दरवर्षी मोफत स्वच्छता केली जाते, ज्यामध्ये मंदिराचा परिसर, शिखरे, दीपमाळेची साफसफाई आणि देवीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते.
ही मोहीम आजपासून सुरू होत आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिराची स्वच्छता सेवा मोफत करत आहे. यामध्ये मंदिराच्या शिखरांसह सरस्वती मंदिर, महाकाली मंदिर, गणपती चौक आणि दीपमाळेच्या स्वच्छतेचा समावेश असतो. या तयारीमुळे नवरात्रोत्सवादरम्यान मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहतो, ज्यामुळे भाविकांना चांगले दर्शन मिळू शकेल.