‘मुख्यमंत्री कोण होणार, हे आमदारांचे संख्याबळ ठरवते’; एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर भाजपचे प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिंदे हेच 2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, असे विधान केले होते. तसेच, त्यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक जिंकल्याचेही त्यांनी म्हटले होते. यापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवण्याबाबत वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘आमदारांचा आकडा जुळल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही’
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. मात्र, लोकशाहीत मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांचे संख्याबळ महत्त्वाचे असते. आवश्यक संख्याबळ जुळल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे सांगत बन यांनी भाजपची भूमिका मांडली. भाजपकडे137 आमदारांचे संख्याबळ असल्याचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामागे संख्याबळ महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
‘महायुतीचा विजय सामूहिक नेतृत्वात’
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपला 137, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 60, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्याचा उल्लेख नवनाथ बन यांनी केला. महायुतीचा विजय हा सामूहिक नेतृत्वात मिळाला होता, असे त्यांनी सांगितले.
भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. कोणाच्या नेतृत्वात किती जागा मिळाल्या, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे, असे म्हणत बन यांनी शिवसेना नेत्यांच्या दाव्यांवर भाष्य केले.
‘मुख्यमंत्रीपदाचे भांडण नाही’
मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणतेही भांडण नसल्याचेही नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांनी कामाला लागावे आणि पक्षाला बळ मिळावे, या उद्देशाने नेते अशी वक्तव्ये करत असतात, असे ते म्हणाले.
भाजपने यापूर्वी 105 आमदार असतानाही मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका घेतली होती, याचा उल्लेख करत बन यांनी राजकीय संख्याबळाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ दाव्यांवर नव्हे, तर विधानसभेतील संख्याबळावर अवलंबून असतो, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरही टीका
यावेळी नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही टीका केली. कोणाचा राजकीय सत्यानाश करायचा किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा, हे जनता ठरवते, असे ते म्हणाले.
दसरा मेळाव्यांमधील भाषणांमुळे महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत शिवसेना नेत्यांकडून व्यक्त होणाऱ्या अपेक्षा आणि भाजपकडून मांडले जाणारे संख्याबळाचे गणित यामुळे राज्यातील राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.