For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन पटनायक यांची कांताबंजीमधूनही उमेदवारी

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन पटनायक यांची कांताबंजीमधूनही उमेदवारी
Advertisement

दोन मतदारसंघांमधून विधानसभेच्या रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

बीजेडी सुप्रीमो आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुऊवारी कांताबंजी विधानसभा मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांनी टिटीलागड उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बीजेडी नेते कार्तिक पांडियन यांच्यासह बालंगीरचे खासदार उमेदवार सुरेंद्र सिंह भोई, ज्येष्ठ नेते अनंग उदय सिंगदेव, तितलागडचे आमदार उमेदवार तुकुनी साहू, बालंगीरचे आमदार उमेदवार कालिकेश सिंगदेव उपस्थित होते. या निवडणुकीत नवीन पटनाईक हे हिंजली या आपल्या पारंपरिक जागेसह कांताबंजी येथून निवडणूक लढवत आहेत. 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी हिंजली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून गुरुवारी त्यांनी कांताबंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. कांताबंजी विधानसभा मतदारसंघातून नवीन पटनायक यांच्याविरोधात भाजपने लक्ष्मणबाग तर काँग्रेसने संतोष सिंग सलुजा यांना उमेदवारी दिली आहे. संतोष सिंग सलुजा हे सध्या या जागेवरून काँग्रेसचे आमदार आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी सकाळी  भुवनेश्वरहून हेलिकॉप्टरने टिटीलागडला रवाना झाले. येथील तुश्रा हवाई पट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा टिटीलागड सिटी स्कूल प्ले ग्राऊंडवर पोहोचला. येथून रोड शो करत मुख्यमंत्री उपजिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री नवीन पटनायक कांताबंजीमधून निवडणूक लढवणार असल्याची बातमी समोर आल्यापासून लोकांमध्ये उत्साह असल्याचे स्थानिक बीजेडी नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. या उत्साहामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा येण्यापूर्वीच बीजेडीचे कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मुख्यमंत्री रिंगणात उतरल्यामुळे येथे संपूर्ण परिसरात आनंदाची लाट पसरली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.