For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन पटनायकांनी सोपविला राजीनामा

06:36 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन पटनायकांनी सोपविला राजीनामा
Advertisement

ओडिशात 24 वर्षांनी बीजद शासन समाप्त : भाजप स्वबळावर स्थापन करणार सरकार

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ओडिशात बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भुवनेश्वरमधील राजभवनात जात राज्यपाल रघुवर दास यांना स्वत:चा राजीनामा सोपविला आहे. पटनायक हे मागील 24 वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री हेते.

Advertisement

मंगळवारी लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा आणि आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दोन्ही राज्यांमध्ये सत्तारुढ पक्षांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. ओडिशात भाजपला 147 पैकी 78 तर बीजदला 51 जागा प्राप्त झाल्या आहेत.  राज्यात आता भाजप प्रथमच स्वत:चे बहुमतातील सरकार स्थापन करणार आहे. भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपद कुणाला देणार हे जाहीर केलेले नाही. पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढविली होती. भाजप लवकरच राज्यपालांची भेट घेत नवे सरकार स्थापन करण्याचा दावा  करणार आहे.

ओडिशात बीजद 2000 सालापासून सत्तेवर राहिला. बीजद अध्यक्ष नवीन पटनायक हे 24 वर्षांपासून मुख्यमंत्री होते. 5 मार्च 2000 साली पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापसून सलग 5 कार्यकाळापर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग (24 वर्षे आणि 165 दिवस) नंतर नवीन पटनायक (24 वर्षे आणि 83 दिवस) सर्वाधिक काळापर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहिलेले देशाचे दुसरे नेते ठरले आहेत. बीजद पुन्हा सत्तेवर आला असता तर पटनायक हे सर्वाधिक काळापर्यंत मुख्यमंत्री पद भूषविणारे नेते ठरले असते.

भाजपसोबत होती आघाडी

भाजप आणि बीजदने दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी केली होती. त्यावेळी बीजदला रालोआचा सर्वात विश्वासार्ह पक्ष मानले जायचे. 2000 साली बीजदने 68 तर भाजपने 38 जागा जिंकल्या होत्या. 147 पैकी 106 जागांवर विजय मिळवत दोन्ही पक्षांनी प्रथम आघाडी सरकार स्थापन करत काँग्रेसला सत्तेवरून दूर केले होते. 2004 च्या निवडणुकीत भाजप आणि बीजदने एकूण 93 जागा जिंकत सत्ता राखली होती.

2009 साली बीजदने तोडली आघाडी

2009 विधानसभा निवडणुकीपूर्वी बीजदने भाजपसोबतची 11 वर्षे जुनी आघाडी तोडली होती. भाजपने विधानसभा निवडणुकीत 40 जागा लढवाव्यात अशी बीजदची इच्छा होती. तर भाजपने 63 जागांची मागणी केली होती. 2019 च्या निवडणुकीत बीजदने 112 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 23, काँग्रेसला 9 आणि अपक्षांना दोन जागा मिळाल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि बीजद यांच्यात आघाडी होईल अशी चर्चा होती, परंतु जागावाटपावर सहमती होऊ शकली नाही. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 10 हून अधिक प्रचारसभा घेतल्या. 4 जून रोजी नवीन पटनायक निवृत्त होतील आणि 10 जून रोजी भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे मोदींनी प्रत्येक सभेत म्हटले होते.

Advertisement
Tags :

.