Gokul Navid Mushrif : गोकुळचे नवे चेअरमन आहेत डॉक्टरेट!
सामजिक सलोख्यासहित त्यांची राजकीय कारकीर्द देखील मोठी आहे
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून कोल्हापुरातील गोकुळ दूधसंस्थेच्या नव्या अध्यक्षपदासाठी राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. अरुण डोंगळेंच्या वक्तव्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असल्याची माहिती समोर आली.
अनेक दिवसांपासून लांबणीवर असणाऱ्या गोकुळच्या नव्या अध्यक्षपदाची निवड आज झाली. सर्व घडामोडींनंतर गोकुळच्या नूतन अध्यक्षपदाचा चेहरा म्हणून नवीद मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. नवीद मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ यांचा जन्म 09 ऑक्टोबर 1986 साली झाला. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण डी. आर. माने महाविद्यालय कागल येथून पूर्ण केले. त्यानंतर रॉयल विद्यापीठ दिल्ली येथून त्यांनी सामाजिक कार्यावर पी.एच.डी. पूर्ण केली आहे. गोकुळने दिलेल्या प्रोफाईलमधून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा सामाजिक सलोखा दांडगा आहे.
सामजिक सलोख्यासहित त्यांची राजकीय कारकीर्द देखील मोठी आहे. दरम्यान, 3 एप्रिल 2010 पासून आजवर ते छत्रपती शिवाजी विविध विकास सोसायटी, कागल येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 4 मे 2010 पासून गोकूळ दूध संघाचे संचालक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर आजपर्यंत ते तिथे संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत.
तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांनी भूषविले आहे. आजवर त्यांनी नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष म्हणून अनेक समाज उपयोगी व आरोग्याची कामे केली आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून विविध गावांमध्ये पक्ष वाढीसाठी युवक संघटनांची स्थापना करण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.
आज अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यसह जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींचे आभार मानले. अध्यक्षपदाच्या निवडीत आमदार सतेज पाटलांची कितपत भूमिका होती असे विचारल्यानंतर त्यांनी 'माझं नावं त्यांनीच सुचवलं' असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सर्व नेतेमंडळींच्या सहकार्याने मला तरुण वयात मोठी जबाबदारी मिळाली आहे.
दूध उत्पादकांच्या हितासाठी मी कायम कार्यरत राहीन. मी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे गोकुळ दूध संघाची गाडी वापरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आजवरच्या गोकुळ चेअरमनपदी विराजमान झालेल्या अध्यक्षांपैकी सर्वात लहान वयातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले जाणार आहे.