For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nandur Madhyameshwar Sanctuary | नांदूरमध्यमेश्वरला निसर्गाची गुलाबी पखरण; कडाक्याच्या उन्हात रोहित पक्ष्यांचे नयनरम्य आगमन!

01:38 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
nandur madhyameshwar sanctuary   नांदूरमध्यमेश्वरला निसर्गाची गुलाबी पखरण  कडाक्याच्या उन्हात रोहित पक्ष्यांचे नयनरम्य आगमन
Advertisement

 निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण असलेल्या आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात, जेव्हा सर्वत्र शुष्कता जाणवू लागते, अशावेळी 'महाराष्ट्राच्या भरतपूर'मध्ये हजारो मैलांचा प्रवास करून 'रोहित' (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या थव्याचे आगमन झाले आहे. 

Advertisement

पक्ष्यांच्या आगमनाने गोदावरी-कादवा नद्यांच्या या संगमावर जणू काही गुलाबी रंगाची उत्सवी लाटच उसळली आहे. निसर्गाचा अनुपम सोहळा आणि गुलाबी रंगाची पखरण दिसतेय.

Advertisement

नेहमी हिवाळ्यात दिसणारे हे पाहुणे यंदा एप्रिलच्या उत्तरार्धात अवतरल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे भरते आले आहे. २८ एप्रिलच्या त्या दुपारी जेव्हा या पक्ष्यांच्या थव्याने जलाशयावर उतरण्यास सुरुवात केली, तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

निळ्याशार संथ पाण्यावर या पक्षांच्या लांबसडक मानेचे आणि गुलाबी पंखांचे प्रतिबिंब पडल्यामुळे संपूर्ण जलाशय एखाद्या जिवंत कॅनव्हाससारखा भासू लागला आहे.कच्छच्या रणातून किंवा दूर परदेशातून आलेल्या या पक्ष्यांना नांदुरमध्यमेश्वरमधील उथळ पाणी आणि मुबलक 'शेवाळ' भुरळ घालत आहे.

विशेष म्हणजे, या उन्हाळ्यातही जलाशयाची पाणीपातळी आणि तेथील खाद्य या पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. या पाहुण्यांचा थवा जेव्हा एका लयीत आकाशात झेप घेतो, तेव्हा त्यांच्या पंखांखालील गडद गुलाबी आणि काळा रंग आकाशात रंगांची उधळण करतो.

Advertisement
Tags :

.