निसर्गाचं पार्लर....1
रोज सकाळी उजाडायच्या आधी दवबिंदू बरोबर देवबाप्पा रंगपेटी पाठवायचा. कारण त्याच्या आधी देवबाप्पांनी जेंव्हा हा सगळा निसर्ग तयार केला त्या वेळेला सगळ्यांना हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिल्या होत्या. पण सगळ्यांचाच रंग सारखा असल्यामुळे कोणाला काही आपलं वेगळं अस्तित्व दाखवता येत नव्हतं. म्हणून सगळेजण देवबाप्पाकडे गेले आणि त्यांनी देवाकडे तक्रार केली की आम्हाला काहीतरी वेगळे दिसेल असे दे. देवबाप्पांनी सांगितले, उद्या सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय गंमत दिसेल ते बघा. देवाकडे टोपलीभर बिया पडलेल्या होत्या. वेगवेगळ्या रंगाचे हौद होते, त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून देवाने दुसऱ्या दिवशी काहीतरी किमया केली. दवबिंदूंच्या बरोबर हे सगळं पाठवून दिलं आणि प्रत्येकाला सांगितलं ज्याला जो रंग आवडेल तो तुम्ही घ्या. कितीही रंग वापरा, रंग कधी संपायचेच नाहीत. अशी ही जादूची रंगपेटी सगळ्यांनाच मिळाली. पक्षी, प्राणी, फळं, फुलं सगळेजण पार्लरमध्ये बसल्यासारखे स्वत:ला रंगवून घेण्यात मश्गूल असायचे. प्रत्येकाला कोणत्या रंगात कोणता रंग मिसळला की नवीन रंग मिळतो हे पण माहिती व्हायला लागलं होतं. सगळ्यांनी फांद्यांचे ब्रश केले आणि भराभर काम करायला सुरुवात केली. सगळ्या भाज्या आता नटून थटून बाजारात जायला तयार झाल्या होत्या. कोणी हिरवे फ्रॉक घातले होते तर कोणी देठांना धरून बाजारात निघाल्या. काही भाज्यांनी तर केसांची म्हणजे पानांची सुंदर हेअर स्टाईलसुद्धा केली होती. डोक्यावरती चंबू बांधून निघायचं ठरवले होते. गुलाबी गाल दिसावे म्हणून गाजराने डोक्यावरती केसांचा तुरा बांधला होता. नाजूक साजूक कोथिंबीर मात्र पान आणि तिच्यावरचे तुरे एखाद्या बुकेसारखी मिरवत निघाली होती. मक्याच्या कणसाने केस लाल रंगवून अंगावर पानांचे जॅकेट घातले होते. टोमॅटो मात्र आपले गाल कमी लाल झाले की काय याचा राग येऊन गाल फुगवून टोपलीत जाऊन बसले होते. येणारे जाणारे अगदी थांबून त्यांच्या त्या फुगऱ्या गालांकडे बघायचे आणि आवर्जून त्यांना पिशवीत घालून आपल्या घरी घेऊन जायचे. हाच लाल रंग टोमॅटोबरोबर असलेल्या बिटानेसुद्धा घेतला होता, पण तो त्यांनी इतका घेतला की थेट आंघोळच केली होती. त्याच्यामुळे बीट घेणाऱ्यांचे एकतर हात नाहीतर पिशवी लाल नक्की होई.
कित्येकदा रंग ओसंडून वाहून जायचा. सगळ्या रंगाची बादली अंगावर ओतून घेतल्याचा हा परिणाम होता. आलं, सुरण, रताळं, बटाटे हे मात्र सगळे मातीत लोळून आलेले असायचे. त्यांना फारसे रंग घ्यायला आवडायचेच नाहीत. नवलकोल, फ्लॉवर, मुळा, काकडी या सगळ्यांनी खूप ब्लिचिंग पावडर लावल्यामुळे त्यांचे रंग पांढरट होऊन गेले होते. कांद्याने मात्र अगदी लाईट गुलाबी रंगाचा मेकअप केला असला तरी झालरीसारखे पदर घ्यावे तसे एक एक पापुद्रे चढवत स्वारी फॅशन शोला आल्यासारखी झाली होती. कोबी ब्रोकोली यांनी मात्र कधी लाईट तर कधी डार्क ग्रीन आणि डार्क रेड असे रंग घेऊन चेंडूसारखं स्वत:ला गडाबडा लोळतच आपले टोपलीत येऊन बसले होते. लिंबाचा पिवळा देखणा रंग, शेजारी भेंडी मॅनिक्युअर केल्याप्रमाणे लांब सडक बोटं रंगवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मिरचीच्या तुकतुकीत रंगावरून तिचा कमी-जास्त तिखटपणा लगेच लक्षात येत होता. वांगी मात्र काळपट निळसर आय शाडो सगळ्या अंगावर लावून घेतल्यामुळे खूप गमतीशीर दिसत होती. लाल भोपळ्याचा रंग आतून बाहेरून सारखाच वाटत होता. कारल्याने हिरवा रंग घेऊनच आपल्या अंगावरती नक्षी करून घेतली होती आणि त्या जाळीदार नक्षीमुळे अगदी आकर्षक वाटत होता. बाकी वेलवर्गीय भाज्या आणि पालेभाज्या यांनी हिरवा रंग आणि आपला डौल कायम राखला होता. हे सगळं पाहिल्यावर आपण एखाद्या फॅशन शोला आलो की काय असंच आम्हाला वाटायला लागलं. फक्त हा फॅशन शो एका उघड्या मैदानात, म्हणजेच मार्केटमध्ये भरलेला होता इतकंच.