गणेश चतुर्थीतील निसर्ग पूजन
गणपती पूजनासाठी जी 21 प्रकारची पत्री वापरली जाते, ती श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात उपलब्ध असते. तुळस, दुर्वा, शमी, बेल, कण्हेर, जास्वंद, अर्जुन, अगस्ती, हादगा, माका...अशी एकवीस प्रकारची पत्री पूजनासाठी वापरण्याच्या परंपरेमुळे लोकमानस परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडले जायचे. पूजेसाठी जी पत्री वापरली जाते, त्यात अन्न, औषध या दृष्टीने विशेष महत्त्व होते आणि त्यासाठी त्यांचा परिचय असणे गरजेचे मानले होते.
चांद्रकालगणनेतील सहाव्या, भाद्रपद महिन्यात गोवा-कोकणच्या परिसरातला हिरवागार निसर्ग आणि पर्यावरण इथे पूर्वापार वास्तव्यास असणाऱ्या मानवी समाजाला उत्साहीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असायचे. डोंगर माथ्यावरून उगम पावणारे ओहोळ, नाले खळाळत खाली येताना, सोबत पाणी घेऊन वाहत येताना, जणूकाही चैतन्याची सनद घेऊन येत असत. आपल्या जगण्यात जो आनंद आणि उत्साह निर्माण झालेला आहे, त्याला आपले कष्ट व मेहनत जरी कारणीभूत असली तरी त्याला दैवी शक्तीचे अधिष्ठानही कारणीभूत असल्याची भावना प्रचलित होती आणि त्यासाठी निसर्गातल्या दिव्यत्वाविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करणे आवश्यक मानले गेले. त्यासाठी प्रारंभी निसर्गातल्या शक्तीला निराकार स्वरुपात पूजणाऱ्या इथल्या मानवी समाजाने त्याला बहुधा हिरव्यागार जंगलांची शान असणाऱ्या गजमुखी, सुपाएवढे कान आणि लंबोदर असणाऱ्या गणपतीची पूजा करण्याला प्राधान्य दिले असावे.
भारतीय सधन जंगलात वास्तव्य करणाऱ्या हत्तीला खायला मुबलक पालापाचोळा, कंदमुळांची त्याचप्रमाणे पिण्यासाठी आवश्यक पाण्याची जेथे उपलब्धता असेल, तेथे त्याला राहण्यास पोषक वातावरण मिळायचे. सस्तन प्राण्यांत मोठा मेंदू लाभलेल्या, या हत्तीला गजानन म्हणून पुजणाऱ्या लोकमानसाला हत्तीची बुद्धिमत्ता, अचाट सामर्थ्य आणि सामाजिक मूल्यांचे त्याच्यात असलेले भान, भावले असावे व यासाठी त्याचे पूजन मोसमी फळा-फुलांद्वारे करण्याला प्राधान्य दिले. गणपती पूजनासाठी जी 21 प्रकारची पत्री वापरली जाते, ती श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात उपलब्ध असते. तुळस, दुर्वा, शमी, बेल, कण्हेर, जास्वंद, अर्जुन, अगस्ती, हादगा, माका...अशी एकवीस प्रकारची पत्री पूजनासाठी वापरण्याच्या परंपरेमुळे लोकमानस परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडले जायचे. पूजेसाठी जी पत्री वापरली जाते, त्यात अन्न, औषध या दृष्टीने विशेष महत्त्व होते व त्यासाठी त्यांचा परिचय असणे गरजेचे मानले होते.
गोवा-कोकणात गणपतीच्या माथ्यावरती जी लाकडी चौकट बांधायचे, त्यात मोसमी फळे-फुले यांची आरास केली जायची. त्यात आईन, आंबा, कवंडाळे, घागऱ्या, कांगला, शेर वड, घायवर्ण, अर्जुन, कर्दळी, ताम्हण, बायो आदी वृक्ष-वनस्पतींच्या विविध घटकांना बांधले जायचे. जंगलात श्रावण-भाद्रपद महिन्यात उपलब्ध असणारी ही वृक्ष-वनस्पतींची फळे-फुले कोणकोणत्या विकारांवरती औषध म्हणून वापरायची, गुराढोरांना अन्न म्हणून पालापाचोळा म्हणून पुरवायची त्याचप्रमाणे औषधी, पौष्टिकता यांनी संपन्न असणाऱ्या घटकांचा भाजीपाला म्हणून कसा वापर करायचा, याचे पारंपरिक ज्ञान समाजाकडे असायचे. त्यावेळी चौकोनी, आयताकृती असणाऱ्या माटोळीला कोणकोणते घटक बांधायचे आणि कोणती फळे बांधू नये, याचे ज्ञान परंपरेने संक्रमित व्हायचे.
आज गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी सहज आणि सोपे वाटणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर भर दिलेला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वजनाने हलक्या तथा रासायनिक रंगकामाने दिसायला आकर्षक असल्याने त्याचप्रमाणे त्यांना हवा तसा महाकाय आकार देण्याला अडचणी नसल्याने, गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या पूजनाला वाव मिळाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विसर्जनावेळी सहजरित्या जलस्रोतांत नष्ट होत नाहीत आणि त्या मूर्ती रंगविण्यासाठी जे रासायनिक रंग वापरले जातात, त्यामुळे जल आणि मृदा प्रदुषणात विलक्षण वाढ होते. त्यामुळे मृण्मयी गणेशमूर्ती आणि त्यांना रंगकाम करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा. माटोळी आणि अन्य सजावट करण्यासाठी वापरलेली फळे-फुले विसर्जनावेळी परिसरातल्या वृक्षांच्या बुंध्याजवळ टाकल्याने, त्यांचे रुपांतर खतात व्हायचे. भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीच्या कालखंडात निसर्ग फळा-फुलांनी परिपुष्ट असतो. भाताच्या पिकांवर लोंब्या आलेल्या असतात. आपल्या कष्टाने जी भाताची कणसे वाऱ्यावर डोलत आहेत. वृक्ष-वनस्पतींवर जी नवागत फळे-फुले आलेली आहेत, त्यांचे सेवन आपण करण्यापूर्वी, ती पृथ्वीमातेच्या मृदेपासून आकाराला आलेल्या गणपतीला भावभक्तीने अर्पण करणे यथोचित मानले जाते. त्यासाठी भाताची ही कणसे गणपतीला अर्पण करण्याची परंपरा आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी, 1893 साली महाराष्ट्रात राष्ट्रभक्ती आणि सामाजिक समरसतेसाठी प्रबोधन त्याचप्रमाणे एकात्मता साध्य व्हावी म्हणून सार्वजनिक स्तरावर गणेशोत्सव साजरा करण्याला पुण्यात चालना दिली. परंतु गोवा-कोकणात मात्र त्यापूर्वीच कौटुंबिक जिव्हाळा आणि एकोपा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हा उत्सव निसर्ग व पर्यावरणातल्या मूल्यांचे पालन करून उत्साहाने साजरा केला जायचा. आंतोनियो लोपिश मेंडिस यांच्या 1886 साली प्रकाशित झालेल्या ‘ए पोर्तुगेझा इंडिया’ या ग्रंथांत मांडवी नदीत नौकाद्वारे जे गणपती मूर्तीचे विसर्जन केले जायचे, त्याची सचित्र माहिती आहे. त्यावरून दीडशे वर्षांपासून गोव्यात सुरू असलेल्या गणपती उत्सवाची कल्पना येते.
परंतु आज सार्वजनिक स्तरावरती ज्याप्रकारे गणपती उत्सवाचे आयोजन केले जात आहे, त्यावरून पूर्वाश्रमीची निसर्ग आणि पर्यावरणाच्या मूल्यांना महत्त्व देण्याची मानसिकता आपल्या समाजात लोप पावलेली आहे. बऱ्याच ठिकाणी गणपतीची इतक्या महाकाय मूर्तीची स्थापना केली जाते की, आपण तिची कल्पना करू शकत नाही. यंदा ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपतीची 22 फूट उंचीची मूर्ती आणताना, ती आकस्मिकरित्या कोसळल्याने त्यात दोघांचा मृत्यू तर पाचजण जखमी होण्याची दुर्घटना उद्भवली. त्यानंतर कुर्ल्यातील प्रेमनगरचा महाराजांच्या 15 फूटी मूर्ती आणताना, ती कोसळून दोघेजण जखमी झाले होते. गणपतीच्या विसर्जनावेळी दाऊकामाची होणारी वारेमाप आतषबाजी आणि कानाच्या पडद्यांबरोबर मानसिक शांती बिघडविणाऱ्या कर्णकर्कश संगीतांचा गडबड-गोंधळ, ध्वनी प्रदुषणाच्या गंभीर समस्यांना कारणीभूत ठरलेला आहे. आपले उत्सव निसर्ग आणि पर्यावरणस्नेही, मानवी मूल्यांचे पालन करणारे होणे आवश्यक आहे.
राजेंद्र पां. केरकर