सावंतवाडीतील 41 व्यावसायिकांना देणार नॅचरल गॅसचे कनेक्शन
पालिकेतील बैठकीत कंपनीकडून ग्वाही
सावंतवाडी प्रतिनिधी
गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हॉटेल व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना लवकरात लवकर नॅचरल गॅस उपलब्ध व्हावा यासाठी पालिका प्रशानाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल 41 हॉटेल व्यावसायिकांना येत्या दिड महिन्यात पीएनजी गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.दरम्यान कनेक्शनसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करा आणि आपल्या व्यवसायाचे होणारे नुकसान टाळा असे आवाहन नगराध्यक्षा सौ श्रध्दा भोसले यांनी केले आहे. तर व्यावसायिक कनेक्शन घेण्यासाठी तब्बल साठ हजार इतका खर्च संबधितांना येणार आहे.त्यात कनेक्शन डीपॉझीट आणि अन्य चार्जचा समावेश आहे. असे कंपनीच्या अधिकार्यांकडुन स्पष्ट करण्यात आले.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेकांचे व्यवसाय केवळ गॅस नसल्यामुळे बंद पडले आहेत.यामुळे शहरातील व्यावसायिकांना लवकरात लवकर कनेक्शन मिळावे यासाठी नगराध्यक्षा सौ भोसले यांच्या माध्यमातून आज शहरातील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर ,नगरसेवक आनंद नेवगी,मोहीनी मडगावकर,प्रतिक बांदेकर,सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित कंपनीच्या अधिकार्यांनी आतापर्यंत शहरात आमच्याकडे 500 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.त्यातील 250 हून अधिक लोकांना घरगुती कनेक्शन देण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात घरगुती कनेक्शन देण्यावर आम्ही भर दिला होता. मात्र,मध्यतंरी निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आता व्यावसायिकांना कनेक्शन देणे गरजेचे आहे.त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा सर्व्हे करुन येत्या दिड महिन्यात कायमस्वरुपी कनेक्शन देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतू त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता आणि रक्कम भरणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी हा गॅस परवडणारा असल्यामुळे कनेक्शन लवकरात लवकर मिळावीत आणि त्यासाठी पालिका प्रशासन आणि संबधित कंपनीने आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती केली.यावेळी व्यावसायिकांचे नुकसान होवू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे त्यामुळे लवकरात लवकर आवश्यक त्या प्रक्रिया पुर्ण करुन संबधित व्यावसायिेकांना कनेक्शन देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल यासाठी एक ते दिड महीन्यात ही प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी नगराध्यक्षांनी दिले.यावेळी जगदीश मांजरेकर,गुरूदास देवस्थळी,जितेद्र पंडीत,राजू भालेकर,परवेझ सय्यद,प्रशांत कासार,वैभव म्हापसेकर, महेंद्र पुरोहित,चेतन वाळके,भिकाजी राउळ,यश सावंत,पुंडलिक दळवी, सर्पराज परवेझ,रमेश पई, यांच्यासह व्यापारी संघटनेचे पुंडलिक दळवी,बाळ बोर्डेकर,कीरण सिध्दे,हेमंत मुंज,उमेश नाटेकर,प्रसाद परब आदी व्यापारी उपस्थित होते.