For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारतातील होळीचे नैसर्गिक रंग

06:30 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतातील होळीचे नैसर्गिक रंग

अत्यंत प्रदुषित राष्ट्रांच्या यादीत जागतिक स्तरावर आपला देश तिसऱ्या क्रमांकावरती 2023 साली पोहोचलेला आहे. बांगलादेश, पाकिस्तान या देशानंतर आपला देश तिसऱ्या स्थानी पोहोचलेला आहे. जगातील एकूण अत्यंत प्रदुषित अशा 15 शहरांपैकी 13 भारतात असून बिहार राज्यातील बेगुसराई येथील हवेचा दर्जा जगात खूपच खालावलेला आहे. हवा, पाणी, मृदा प्रदुषणाची समस्या देशभरात धोकादायक वळणावरती पोहोचलेली आहे. परंतु भारतातल्या महानगरांत हवा, पाणी, मृदा प्रदुषणाचा दिवसेंदिवस दर्जा खालावत चाललेला आहे. आज देशभरात वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही धोकादायक अशा रसायनांचा उपयोग करत असल्याने हवा, पाणी आणि मृदा प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. चांद्र कालगणनेतील शेवटच्या महिन्यात म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला देशभर होळीचा सण साजरा केला जात असून, आजकाल रंगपंचमी साजरी करण्यासाठी अधिकाधिक रासायनिक रंगांचा वापर होत असल्याने अशा रंगांमुळे हवा, पाणी आणि मृदा प्रदुषणाची समस्या शिखरस्थानी पोहोचलेली पाहायला मिळते.

Advertisement

सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे खाद्यान्नाला रंग आणि चव लाभावी म्हणून आपण बऱ्याच कृत्रिम रंगांचा वापर करत असतो परंतु या रंगांच्या वापरामुळे आज माणसासमोर कर्करोग आणि तत्सम गंभीर रोगांचा धोका निर्माण झालेला आहे. कृत्रिम रंगांचा वापर खाद्यान्नात होत असल्याने, अशा पदार्थांमध्ये बेंझिनसारख्या रसायनांचा वापर केला जातो आणि या कृत्रिम रंगांचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने कर्करोग आणि अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. टारट्राझिन नावाचा पिवळा रंग दमा आणि पित्ताच्या समस्यांना चालना देत असतो. आज हवेचे प्रदूषण वाढत असून, त्याला जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायुबरोबर धुळही विशेष कारण ठरलेले आहे. प्रदुषित हवा जशी आपल्या फुफ्फुसासाठी हानिकारक आहे, तशीच ती डोकेदुखीचेसुद्धा मुख्य कारण ठरलेली आहे. त्यामुळे उलट्या होणे, चिडचिड वाढणे आणि तणावात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आज आपण होळीचा सण साजरा करण्यासाठी जे विविध रासायनिक रंग वापरतो, त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढण्याबरोबर त्याचे गंभीर दुष्परिणाम समस्त सजीवांना भोगावे लागत आहेत.

काळ्या रंगाच्या निर्मितीसाठी शिशाचे भस्म वापरण्यात येते आणि त्या रंगाच्या प्रादुर्भावामुळे मुत्रपिंडाचे आजार होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. हिरव्या रंगाची निर्मिती करण्यासाठी कॉपर सल्फेट वापरण्यात येते आणि त्यामुळे नेत्रविकारात वृद्धी होण्याबरोबर डोळे सुजत असल्याचे दिसून आलेले आहे. चंदेरी रंगासाठी सध्या अॅल्युमिनियम ब्रॉमाईड वापरल्याने, ते कर्करोगास कारण ठरलेले आहे. निळ्या रंगासाठी प्रशियन ब्लूचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्वचारोगाची समस्या उद्भवत असते. लाल रंगासाठी मर्क्युरी सल्फाईट वापरले जाते, जे अतिविषारी असून, कर्करोगास कारण ठरलेले आहे. क्रोमियम ऑक्साईडचा वापर जांभळ्या रंगासाठी होत असून, त्यामुळे दम्याचा विकार बळावत असल्याचे दृष्टीस पडलेले आहे. होळीतल्या रंगपंचमीसाठी आपण जे अशाप्रकारचे रंग वापरतो, त्यामुळे त्वचेला काहीवेळा पाण्याचे फोड येण्याच्या शक्यतेत वाढ झालेली आहे. रंगोत्सव साजरा करताना पिचकारीतील अशा रंगांनी युक्त पाणी वेगाने डोळ्यांतल्या बुब्बुळावर पडून तेथे रक्त साठू शकते तर काहीवेळा त्यातून मोतिबिंदू होण्याची शक्यता वाढते.

Advertisement

त्यासाठी होळीचा सण साजरा करताना जे रंग वापरले जातात, त्यात जहाल रसायनांचे घटक बऱ्याचदा ज्यादा असल्याने, त्याचे गंभीर दुष्परिणाम माणसाबरोबर सजीवांवर प्रकर्षाने जाणवू लागलेले आहेत आणि म्हणून अशा रंगांच्या वापरावर प्रतिबंध घालण्याची नितांत गरज आहे. होळीचा सण आपण सत्याचा असत्यावर विजय मिळाला, आसुरी शक्तीचे निर्दालन झाले म्हणून उत्साहाने साजरा करतो. परंतु अपायकारक रासायनिक घटकांमुळे अशा रंगांचा वापर रंगपंचमीत करण्यात येत असल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांसंदर्भात आमचे दुर्लक्ष होत आहे. हवा, पाणी, मृदाच नव्हे तर पर्यावरणात प्रदुषणाची मात्रा वाढवण्यात असे विषारी रंग कारणीभूत ठरत आहे. या संदर्भात समाजात जागृती करून, त्यांचा वापर रोखण्याची गरज निर्माण झालेली आहे. होळीच्या रंगपंचमीसाठी पूर्वीच्या काळी आपल्या परिसरात जी मोसमी फुले, फळे, पाने उपलब्ध असायची, त्यांचा कल्पकतेने वापर करून नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जायची. शिशिर ऋतूत पलाश वृक्षावरती जी भगव्या रंगाची फुले फुलायची, सावरीची लाल फुले उपलब्ध असायची, त्यांचा वापर करून रंग तयार केले जायचे. पिचकारीत अशा रंगांचा वापर होत असल्याने त्याचे मन:स्ताप लोकांना सोसावे लागत नसे. नदीकिनारी केशराची झुडुपे मोठ्या प्रमाणात सुरक्षित असायची. त्यांच्यावर जी बोंडे परिपक्व व्हायची, त्यातून प्राप्त होणारा केशर रंग प्रामुख्याने केशरिया म्हणून परिचित होता. देशभरातल्या होळीच्या लोकगीतांत केशरिया रंगाचा जो उल्लेख आढळतो, तो केशराच्या झुडुपावरती येणाऱ्या बोंडातून प्राप्त व्हायचा.

Advertisement

होळीसाठी रंगोत्सव साजरा करताना, त्या त्या प्रदेशात जी वृक्षसंपदा असायची, ती ऋतुनुसार फुले, फळे, पाने उपलब्ध करून द्यायची, ज्याच्यापासून गावात असणारी रंगारी आणि अन्य कष्टकरी मंडळी नैसर्गिक रंगांची निर्मिती करायची. पलाश, सावरीसारख्या वृक्षांची मोसमी फुले औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याने, अशा रंगांचा वापर मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत नसे. काही ठिकाणी जी माती उपलब्ध व्हायची, त्याच्यापासूनही तांबडा रंग प्राप्त व्हायचा. तांदळाच्या पिठाचा वापर करून पांढऱ्या रंगाची निर्मिती व्हायची. हळदीपासून उपलब्ध पिवळा रंग भंडारा उधळण्याच्यावेळी वापरला जायचा. पूर्वी भारतातल्या बऱ्याच ठिकाणी निळ्या रंगाची पैदासी करणारी निळीची वनस्पती लावली जायची. अशा वनस्पतीजन्य रंगांचा वापर जेव्हा रंगोत्सवात व्हायचा तेव्हा त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत नसायचे. आज हवा, पाणी, मृदा प्रदुषणाची समस्या जेव्हा देशभर वृद्धिंगत होत चालली आहे, अशा पार्श्वभूमीवर आम्ही घातक रासायनिक रंगांचा वापर करून आमच्या सभोवताली असणाऱ्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाला संकटे निर्माण करीत आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. निसर्गात जी वृक्षवनस्पती उपलब्ध आहेत, त्यांच्या आरोग्यदायी अशा घटकांचा वापर रंगांच्या निर्मितीसाठी करणे, ही लोकचळवळ सुरू होणे गरजेचे आहे. रंगांचा उत्सव पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी प्रयत्न शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, महिला मंडळे याद्वारे होणे गरजेचे आहे. आपल्या राष्ट्रात आजच्या घडीस हवा, पाणी आणि मृदा प्रदुषणाची जी समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे, त्यासंदर्भात लोकजागृती करून पर्यावरणस्नेही होळीचा सण साजरा झाला पाहिजे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
×

.