चंद्रावर सापडला नैसर्गिक बंकर
जमिनीखाली 50 किलोमीटर लांबीच्या भुयाराचे संकेत
चंद्रावर मानवी वस्ती उभारण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध सुरू असतानाच, चंद्राच्या पृष्ठभागाखाली सुमारे 50 किलोमीटर लांबीचे नैसर्गिक भुयार असण्याचे संकेत मिळाले आहेत. जपानची अंतराळ संस्था ‘जाक्सा’च्या कागुया ऑर्बिटरकडून मिळालेल्या रडार डाटाच्या विश्लेषणातून ही शक्यता समोर आली आहे. चंद्रावरील भविष्यातील मानवी मोहिमांसाठी हा शोध महत्त्वाचा ठरू शकतो.
मारियस हिल्स परिसरात भुयाराचे संकेत
चंद्रावरील मारियस हिल्स या भागात 2009 मध्ये कागुया ऑर्बिटरने सुमारे 50 मीटर रुंद आणि 50 मीटर खोल ख•ा नोंदवला होता. हा ख•ा जमिनीखाली मोठ्या पोकळीचा प्रवेशमार्ग असू शकतो असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. त्यानंतर रडारमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या भागातील भूगर्भीय रचनेचा अभ्यास करण्यात आला.
अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाले असावे भुयार
वैज्ञानिकांच्या मते, चंद्रावर प्राचीन काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे अशाप्रकारच्या लावा नळ्या तयार झाल्या असाव्यात, लावाचा बाहेरील थर थंड होऊन घट्ट झाला आणि आतील लावा पुढे वाहून गेल्यानंतर पोकळ भुयार निर्माण झाले असावे. हे भुयार सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी उपयुक्त
चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरणाचे संरक्षण नसल्याने अंतराळातील हानिकारक किरणे, सुक्ष्म उल्कापिंड आणि तापमानातील तीव्र चढउतार यांचा धोका असतो. जमिनीखालील नैसर्गिक भुयारामुळे या धोक्यांपासून काही प्रमाणात संरक्ष मिळू शकते. त्यामुळे भविष्यात चंद्रावर संशोधन केंद्र किंवा मानवी निवासस्थान उभारण्यासाठी अशा रचनांचा उपयोग होऊ शकतो.
अद्याप अंतिम पुष्टी नाही
रडारच्या निरीक्षणांवरून भुयार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी त्याची संपूर्ण लांबी, अंतर्गत रचना आणि स्थिरता यांची प्रत्यक्ष पुष्टी झालेली नाही. तसेच या भुयारात पाणी किंवा बर्फ असल्याचेही अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या नैसर्गिक रचनेचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी अधिक संशोधन आवश्यक आहे. चंद्र्राच्या पृष्ठभागाखाली दडलेल्या या संभाव्य भुयाराचा सखोल अभ्यास झाल्यास चंद्राचा प्राचीन इतिहास समजून घेण्यासह भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांनाही नवी दिशा मिळू शकते.
संभाव्य गुहेच्या अभ्यासाची तयारी
चंद्रावरील या भागाचे महत्त्व लक्षात घेऊन नासाने 2031 मध्ये संभाव्य मोहिमेद्वारे मारियस हिल्स परिसरातील ख•dयाखाली गुहा किंवा लावा नळी आहे का याचा शोध घेण्याची योजना पुढे नेली आहे. प्रस्तावित मोहिमेत जमिनीखालील रचना तपासण्यासाठी रडार, गुरुत्वमापक, भूकंपीय उपकरणे आणि कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या अभ्यासातून भुयाराचे अस्तित्व, आकार आणि स्थिरता याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
मानवी वस्ती उभारण्याची शक्यता
चंद्राच्या पृष्ठभागाखाली मोठी नैसर्गिक पोकळी आढळल्यास अंतराळवीरांना किरणोत्सर्ग, सूक्ष्म उल्कापिंड आणि तापमानातील तीव्र बदलांपासून संरक्षण मिळू शकते. त्यामुळे भविष्यात संशोधन केंद्रे उभारण्यासाठी अशा जागांचा विचार केला जाऊ शकतो, मात्र, भुयाराच्या छताची मजबुती, प्रवेशमार्ग, अंतर्गत वातावरण आणि सुरक्षितता तपासल्यावरच त्याच्या प्रत्यक्ष वापराबाबत निर्णय घेता येईल.
